पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:34 IST2025-08-18T17:33:39+5:302025-08-18T17:34:16+5:30

राजकुमारने केलेल्या हल्ल्यात कविता गंभीर जखमी झाली, तिच्या हाताची २ बोटे तुटली. बीडीके हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून तिला जयपूरला नेण्यात आले.

In Rajasthan, Police constable attacked wife and son with sword; then jumps in front of moving train | पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...

पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात सोमवारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या कॉन्स्टेबल राजकुमार कांटीवालने घरगुती वादातून पत्नी कविता आणि मुलावर तलवारीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. तिच्या हाताची २ बोटे तुटली, मुलाच्या गळ्यावर तीक्ष्ण वार झाल्याने तोदेखील गंभीर आहे. या हल्ल्यानंतर आरोपी राजकुमार शहरातील रेल्वे ट्रॅकवर गेला आणि ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. 

माहितीनुसार, आरोपी किसान कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहत होता. पहाटे ४.३० च्या सुमारास पती-पत्नी यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात राजकुमारने तलवारीने पत्नीवर वार केला, या दोघांच्या वादात पडलेल्या मुलावरही बापाने हल्ला केला. घरातील आरडाओरड ऐकून शेजारील लोक धावत आले. त्यानंतर तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पहाटे ५ च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहचली परंतु तोवर आरोपी राजकुमार तिथून पळून गेला होता. पोलिसांनी घटनेचा तपास केला तेव्हा राजकुमारने २ दिवसापूर्वी तलवार घरात लपवून ठेवल्याचे समोर आले. त्यातून पत्नीच्या हत्येची योजना त्याने आधीच आखल्याचं स्पष्ट झाले. 

राजकुमारने केलेल्या हल्ल्यात कविता गंभीर जखमी झाली, तिच्या हाताची २ बोटे तुटली. बीडीके हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करून तिला जयपूरला नेण्यात आले. मुलावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १६ ऑगस्टला राजकुमार ड्युटीवरून सुट्टी घेऊन घरी आला होता. तो घरी आल्यापासून कौटुंबिक वाद वाढला होता. २ दिवस घरातील वातावरण तणावग्रस्त होते. त्यानंतर सोमवारी सकाळी ही घटना घडली. मागील ५ वर्षापासून पती-पत्नी यांच्यात वाद सुरू होता. हा वाद कोर्टापर्यंत पोहचला होता. २० ऑगस्टला घटस्फोटाची पुढची सुनावणी होती. त्यातूनच आलेला दबाव आणि मानसिक तणावामुळे राजकुमारने हे पाऊल उचलले असं बोलले जाते. 

दरम्यान, पत्नी आणि मुलावर हल्ला करून राजकुमार घरातून पळून गेला. त्यानंतर थोड्याच वेळात तो रतन शहर रेल्वे ट्रॅकवर पोहचला. तिथे धावत्या ट्रेनसमोर उडी मारून राजकुमारने जीवन संपवले. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले. त्याशिवाय पत्नी आणि मुलावर हल्ला करण्यात आलेली तलवारही पोलिसांनी जप्त केली. कौटुंबिक वाद आणि घटस्फोटासाठी सुरू असलेली कायदेशीर लढाई यातूनच ही घटना घडल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे.

Web Title: In Rajasthan, Police constable attacked wife and son with sword; then jumps in front of moving train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.