उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या राजवीर यादव या बालकाची हत्या झाल्याचे उघड झाले असून, या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले आहे. आपल्या आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिल्याने आणि याबद्दल घरच्यांना सांगण्याची धमकी दिल्याने, आईच्याच प्रियकराने राजवीरचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी या नराधम प्रियकराला बेड्या ठोकल्या असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राजवीर हा आपल्या आईसोबत मामाच्या घरी राहत होता. दोन दिवसांपूर्वी तो अचानक बेपत्ता झाला, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. रविवारी रात्री उशिरा देवरिया देहात गावाजवळील झाडीत राजवीरचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयावरून आईचा प्रियकर डब्लू गोंड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने रचलेला हत्येचा कट उघडकीस आला.
'मामाला सांगेन' म्हटल्याने घेतला जीव
आरोपी डब्लू गोंड याने पोलिसांना सांगितले की, राजवीरने त्याला आणि त्याच्या आईला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. हे गुपित कोणालाही सांगू नये म्हणून आरोपीने राजवीरला अनेक आमिषे दाखवली, मात्र राजवीर ऐकायला तयार नव्हता. "मी सगळं मामाला सांगेन," असे त्याने ठणकावून सांगितले. या एका वाक्यामुळे आरोपी घाबरला आणि त्याने राजवीरला कायमचे संपवण्याचा कट रचला.
झाडीत नेऊन गळा आवळला
राजवीरची आई त्याला बाजारात कपडे घेण्यासाठी पाठवत असताना, वाटेतच डब्लूने त्याला आपल्या दुचाकीवर बसवले. त्याला एका निर्जन स्थळी नेऊन आपल्याकडे असलेल्या रुमालाने त्याचा गळा आवळला. श्वास कोंडल्याने राजवीरचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने त्याचा मृतदेह झाडाझुडपात फेकून दिला आणि पसार झाला.
पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलला
कोतवाल संजय कुमार दुबे यांनी सांगितले की, सुरुवातीला आरोपी पोलिसांची दिशाभूल करत होता. मात्र, त्याच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी कडक चौकशी केली. अखेर त्याने हत्येची कबुली दिली आणि त्याच्याच निशाणीवरून राजवीरचा मृतदेह जप्त करण्यात आला. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून, आईच्या अनैतिक संबंधांमुळे एका निष्पाप मुलाला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a 12-year-old boy was murdered by his mother's lover after threatening to expose their affair. The accused confessed to strangling the boy, who had seen them together. Police have arrested the culprit.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक 12 वर्षीय लड़के की हत्या उसकी माँ के प्रेमी ने रिश्ते उजागर करने की धमकी देने के बाद कर दी। आरोपी ने लड़के का गला घोंटकर हत्या करने की बात कबूल की, जिसने उन्हें एक साथ देखा था। पुलिस ने अपराधी को गिरफ्तार कर लिया है।