"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:12 IST2025-08-12T11:12:28+5:302025-08-12T11:12:48+5:30
धर्म बदलण्याचा दबाव टाकणाऱ्या प्रियकरासोबतच त्याच्या कुटुंबाने दिलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने आपलं आयुष्य संपवलं.

"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
लग्न करायचंय म्हणून धर्म बदलण्याचा दबाव टाकणाऱ्या प्रियकरासोबतच त्याच्या कुटुंबाने दिलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणीने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. केरळच्या एर्नाकुलम भागात २३ वर्षांच्या तरुणीने हे टोकाचे पाऊल चालले आहे. या तरुणीचे नाव सोना एल्दोज असून, शनिवारी तिचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. या मृतदेहाजवळच पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली.
या तरुणीच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे तिच्या प्रियकरला पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाचे नाव रमीज असून, त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. तरुणीने आपल्या शेवटच्या चिठ्ठीत लिहिले की, 'रामीजने हे सिद्ध केले, की तो माझ्यावर प्रेम करत नाही. मी कोणत्याही धार्मिक रिती न करता, कोर्टात लग्न करण्यास तयार होते, पण लग्न करण्यासाठी मी माझा धर्म बदलावा असे त्याला वाटत होते.'
धर्म बदलण्यासाठी दबाव
मृत तरुणीने आपल्या चिठ्ठीत लिहिले की, "कोर्टात लग्न करण्याच्या बहाण्याने तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. पण, त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या कुटुंबाने मी धर्म बदलावा यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मी त्यांना यासाठी नकार दिला, तर त्यांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली."
तरुणीच्या कुटुंबाने काय म्हटलं?
सोनाचा भाऊ बेसिल याने म्हटले की, सोना आणि रमीज एकाच कॉलेजमध्ये होते. तिथेच त्यांची भेट झाली. सोना आणि रमीज यांचं लग्न ठरलं होतं, पण आमच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झाल्याने हे लग्न वर्षभर पुढे ढकलले होते. तर, सोनाची आई म्हणाली की, रमीजच्या कुटुंबाने त्याचे स्थळ सोनासाठी आणले होते. सुरुवातीला आम्ही लग्नासाठी तयार होतो. पण, जेव्हा रमीजचे नाव एका गुन्ह्यात समोर आले तेव्हा आमचा या नात्याला नकार होता.
तो सोनाला घरी घेऊन गेला अन्...
रमीजने कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने सोनाला त्याच्या घरी नेले आणि तिथेच धर्म बदलण्यासाठी तिच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली. जर तिला त्याच्याशी लग्न करायचे असेल, तर तिला तिचा धर्म बदलावा लागेल असे रमीज सोनाला म्हणाला. मात्र, सोनाने यासाठी नकार दिल्यावर रमीज आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. रमीज आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी सोनाला एका खोलीत बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर सोना रमीजच्या घरातून पळून गेली आणि स्वतःच्या घरी पोहोचली. तिने स्वतःची आपबिती कुटुंबाला सांगितली. कुटुंबाला या अत्याचाराबद्दल सांगितल्यानंतर तिने काही तासांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. सोनाच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली, ज्याच्या आधारे तिचा प्रियकर रमीजला अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.