'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 19:39 IST2025-08-23T19:38:30+5:302025-08-23T19:39:23+5:30
उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ पोलीस दलात खळबळ उडाली.

'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा भाचा विक्रम सिंह राणा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. 'माझ्यासमोर मरण्याशिवाय काहीच पर्याय राहिलेला नाही', असं म्हणणार्या विक्रम सिंह राणांच्या व्हिडीओने पोलीस दलही हादरले. हे प्रकरण १८ कोटी रुपयांचे असून, पोलिसांनी याबद्दल माहिती दिली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विक्रम सिंह राणा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी १८ कोटी रुपयांच्या प्रकरणाचा उल्लेख केला आहे. त्यांनी डेहरादून पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
व्हिडीओमध्ये राणा म्हणत आहेत की, 'डिसेंबर २०२४ मध्ये डेहरादून पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पण आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पोलीस पक्षपातीपणा करत आहे, असा आरोप त्याने केला आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली. डेहरादूनचे पोलीस अधीक्षकांनी निवेदन प्रसिद्ध करून भूमिका स्पष्ट केली. विक्रम सिंह यांच्या तक्रारीचा तपास मसुरीच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवलेला आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तक्रारदाराला न्यायालयात खटला दाखल करण्याचा सल्ला दिला गेला होता.
दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा तपास एसपींकडे देण्यात आली आहे. ते या घटनेची सर्व अंगाने चौकशी करतील. सोशल मीडियावरून केलेले गंभीर आरोप आणि आत्महत्या करण्याच्या धमक्यांची दखल घेतली गेली असून, आवश्यक पावले उचलली जात आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.