मी डबल मर्डर केला, मला अटक करा! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला अन् दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 22:17 IST2021-10-04T22:16:52+5:302021-10-04T22:17:40+5:30
Double Murder Case : पत्नीनेही त्याला यात मदत केली. छत्तीसगडमधील जशपूर भागात ही धक्कादायक घटना घडली.

मी डबल मर्डर केला, मला अटक करा! मध्यरात्री पोलीस ठाण्यात आली महिला अन् दिली कबुली
दोघांची हत्या केली असून मला अटक करा, अशी कबुली देत मध्यरात्री एक महिला पोलीस ठाणं गाठते आणि नंतर पोलिसांनाही धक्का बसतो. महिलेनं आणि तिच्या पतीनं दोघांची हत्या करून त्यांचे मृतदेह घरात ठेवले होते. महिलेच्या पतीने त्याच्या सख्ख्या भावाचा आणि वहिनीची हत्या केली. आपला भाऊ जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून आरोपीने भाऊ आणि वहिनीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्याच्या पत्नीनेही त्याला यात मदत केली. छत्तीसगडमधील जशपूर भागात ही धक्कादायक घटना घडली.
जशपूर भागातील एका गावात मोठा भाऊ मथनू राम आणि त्यांची पत्नी गंगोत्री बाई राहत होते. त्यांच्याच समोर बुधमन भगत आणि त्याची पत्नी सुंदरीबाई राहत होते. घटनेच्या दिवशी आरोपी बुधमन मथनू यांच्या घरात कुऱ्हाड घेऊन घुसला. मथनूला काहीही न बोलू देता थेट त्याने कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली. या घटनेने घाबरलेल्या गंगोत्री बाईंनी घराबाहेर धाव घेत आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर बुधमननं तिचा पाठलाग करत कुऱ्हाडीचा वार करून तिचाही खून केला. पती आणि पत्नी या दोघांचेही मृतदेह काही अंतरावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते.
आपला भाऊ आणि वहिनी जादूटोणा आणि काळी जादू करत असल्याचा संशय बुधमन आणि त्याच्या पत्नीला होता. काही दिवसांपूर्वी बुधमनच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आपल्या भावाने जादूटोणा केल्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा संशय बुधमन आणि त्याच्या पत्नीला होता. या रागातून बुधमनने भाऊ मथनू आणि वहिनी गंगोत्रीबाईंवर कुऱ्हाडीने घाव घालून त्यांची निर्घुण हत्या केली.