कमी मार्क मिळाले म्हणून आई-वडील ओरडले, रागाच्या भरात १०वीतील मुलगी छतावर गेली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:25 IST2025-11-25T16:24:25+5:302025-11-25T16:25:16+5:30
school girl suicide: परीक्षेत चांगली कामगिरी करता न आल्याने पालक तिला खूप ओरडले होते

कमी मार्क मिळाले म्हणून आई-वडील ओरडले, रागाच्या भरात १०वीतील मुलगी छतावर गेली अन्...
school girl suicide: तेलंगणातील हैदराबाद येथे एका दहावीच्या विद्यार्थिनीने तिच्या अपार्टमेंटच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पालकांनी ओरडल्यानंतर दु:खाच्या भरात तिने हे विचित्र पाऊल उचलले. इमारतीवरून खाली पडल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिला मृत घोषित केले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हबसीगुडा येथे ही घटना घडली असून, वैष्णवी असे मृत मुलीचे नाव आहे.
कमी मार्क मिळाल्याने घेतला टोकाचा निर्णय
ती मुलगी दहावीत शिकत होती. तिने तिच्या अपार्टमेंट इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, तिचे पालक तिला चांगले गुण न मिळाल्याने ओरडले होते. पालकांच्या फटकारामुळे दुःखी होऊन वैष्णवीने इमारतीच्या छतावरून उडी मारली. अपार्टमेंटच्या छतावरून पडल्यानंतर स्थानिकांनी गंभीर जखमी वैष्णवीला तातडीने गांधी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच उस्मानिया विद्यापीठ (OU) पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि कुटुंबीयांची चौकशी केली. पोलिसांनी सांगितले की, घडलेल्या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.
वैष्णवीच्या शाळेतही केली जाणार चौकशी
वैष्णवीने छतावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या अपार्टमेंटमधून पोलीस फॉरेन्सिक टीमसह पुरावे गोळा करत आहेत. छतापासून इमारतीच्या खालच्या मजल्यापर्यंत किती अंतर होते आणि ती तिथे कशी पोहोचली याचाही तपास ते करत आहेत. पोलिसांनी विद्यार्थिनीच्या श्री चैतन्य शाळेचीही चौकशी केली आहे आणि या प्रकरणात जबाब नोंदवले जात आहेत. शिवाय, पोलिसांनी वैष्णवीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की पालक आणि शिक्षकांनी मुलांवरील अभ्यासाचा दबाव लक्षात घ्यावा आणि त्यांची मानसिक स्थिती समजून घ्यावी. तरच अशा गोष्टी थांबवता येतील.