उच्च शिक्षित पती, थाटात लग्न, पण वेटरवर झालं प्रेम! लग्नानंतर ९० दिवसांतच पत्नीने नवऱ्याचा काटा काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:09 IST2026-02-06T12:00:30+5:302026-02-06T12:09:07+5:30
राजस्थानमध्ये पत्नीने प्रियकराच्या मदतीने लग्नानंतर तीन महिन्यातच पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

उच्च शिक्षित पती, थाटात लग्न, पण वेटरवर झालं प्रेम! लग्नानंतर ९० दिवसांतच पत्नीने नवऱ्याचा काटा काढला
Rajasthan Honeymoon Murder: दोन कुटुंबांतील जुने संबंध, रक्ताची नाती आणि थाटामाटात पार पडलेल्या विवाहाच्या आनंदावर एका क्रूर कटाने विरजण घातले. श्रीगंगानगर जिल्ह्यात एका २३ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने लग्नाला केवळ तीन महिने झाले असताना पतीची हत्या केली. या घटनेने केवळ दोन्ही कुटुंबेच नव्हे, तर संपूर्ण राजस्थान सुन्न झाले आहे.
सादुलशहर येथील अंजली (वय २३) हिचा विवाह तीन महिन्यांपूर्वी आशिष (वय २७) याच्याशी झाला होता. आशिष हा भूगर्भशास्त्रात एम.एस्सी. होता आणि बी.एड. करत होता. दुसरीकडे अंजली एम.कॉम.चे शिक्षण घेत होती. आशिषला त्याच्या काका-काकूंनी दत्तक घेतले होते आणि त्याच्या दत्तक आईनेच त्यांची भाचीशी म्हणजेच अंजलीशी) त्याचे लग्न लावून दिले होते. दोन्ही कुटुंबांत आधीपासूनच तीन लग्ने झाली होती, त्यामुळे हे नाते अत्यंत घट्ट मानले जात होते.
३० जानेवारीच्या संध्याकाळी अंजली आणि आशिष घराबाहेर फिरायला गेले होते. आशिषच्या भावाने सांगितले की, "आम्ही रोजच्या वाटेने फिरायला जातो, पण त्या दिवशी अंजलीच्या सांगण्यावरुन ते एका निर्जन रस्त्यावरून गेले. काही वेळानंतर आशिष आणि अंजली बेशुद्धावस्थेत सापडले. सुरुवातीला हा अपघात असल्याचा बनाव करण्यात आला. आशिषला मृत घोषित करण्यात आले, तर अंजलीने शुद्धीवर आल्यावर आपली सोन्याची दागिने चोरीला गेल्याचे नाटक केले."
पोलिस तपासात 'लव्ह ट्रँगल' उघड
आशिषच्या शरीरावरील जखमा आणि अंजलीचे बोलणं पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर तपासात धक्कादायक वास्तव समोर आले. अंजलीचे लग्नापूर्वी संजू नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते, जो लग्नांमध्ये वेटरचे काम करायचा. अंजलीने संजूच्या मदतीने आशिषचा काटा काढण्याचा कट रचला होता. संजू आणि त्याच्या दोन मित्रांनी झुडपात लपून आशिषवर हल्ला केला, त्याचा गळा आवळला आणि या हत्येला अपघाताचे रूप देण्याचा प्रयत्न केला.
"तिला फाशीचीच शिक्षा द्या"; दोन्ही कुटुंबांची मागणी
या घटनेमुळे आशिषचे वडील रामरख यांना प्रचंड संतप्त झाले आहेत. "अंजलीचे वागणे नेहमी सामान्य वाटायचे. ती कुटुंबात चांगली मिसळली होती. हत्येनंतर तिने बेशुद्ध असल्याचे नाटक केले. आम्हाला तिला फाशीचीच शिक्षा मिळालेली पाहायची आहे. तिचे स्वतःचे कुटुंबही आमच्या या मागणीशी सहमत आहे."
दुसरीकडे, अंजलीच्या घरातही संतापाचे वातावरण आहे. तिचे वडील १३ वर्षांपूर्वीच वारले होते. अंजलीच्या काकांनी रडत सांगितले की, "आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत. या कुटुंबाशी आमचे ५० वर्षांचे नाते आहे. आमच्या मुलीचे असे प्रेमप्रकरण असेल याची आम्हाला पुसटशी कल्पनाही नव्हती. आम्हाला प्रचंड लाज वाटतेय. जर हे माहित असते, तर आम्ही लग्नाऐवजी मरणे पसंत केले असते. अंजली आणि त्या तिन्ही नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. ज्या प्रकारे आशिष तडफडून मेला, तशीच शिक्षा तिला मिळावी. तिने आम्हाला कोणालाही तोंड दाखवण्यालायक ठेवले नाही."
आशिषचे कुटुंब श्रीमंत होते आणि तो उच्चशिक्षित होता. दुसरीकडे, ज्या संजूसाठी अंजलीने ही हत्या केली, तो अशिक्षित होता आणि वेटरचे काम करून जेमतेम पोट भरायचा. एका सुशिक्षित मुलीने अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीसाठी आपल्या पतीचा जीव घ्यावा, यासाठी स्थानिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी अंजली, तिचा प्रियकर संजू आणि त्याचे दोन मित्र रोहित व बादल यांना अटक केली आहे. संजूचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता, तरीही त्याने अंजलीच्या सांगण्यावरून हे टोकाचे पाऊल उचलले. संपूर्ण श्रीगंगानगरमध्ये या हनिमून मर्डरची चर्चा असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.