"तो गोळीबार करत होता, मी त्याला वाचवण्यासाठी उभी होते", हत्येची साक्षीदार असलेल्या शिवानीने सांगितला घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:38 IST2026-03-24T11:36:02+5:302026-03-24T11:38:54+5:30
Udai pratap college murder Case: वाराणसीतील उदय प्रताप स्वायत्त महाविद्यालयात एका विद्यार्थ्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. या हत्येची साक्षीदार असलेल्या तरुणीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

"तो गोळीबार करत होता, मी त्याला वाचवण्यासाठी उभी होते", हत्येची साक्षीदार असलेल्या शिवानीने सांगितला घटनाक्रम
"सगळे लपलेले होते आणि जे घडत होतं तो तमाशा बघत होते. तो गोळ्या झाडत राहिला. थोडी हिंमत केली असती तर सूर्या आज जिवंत असता." वाराणसीतील उदय प्रताप महाविद्यालयात एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या हत्येतील प्रत्यक्षदर्शी तरुणीने जे घडले त्याबद्दल सांगितलं. सूर्य प्रताप सिंह या विद्यार्थ्याच्या हत्येने वाराणसीमध्ये खळबळ माजली आहे.
वाराणसीतील उदय प्रताप महाविद्यालयात वर्गाच्या बाहेरच सूर्य प्रताप सिंह या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. या हत्येने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या हत्या प्रकरणात नवनवी माहिती समोर येत असून, या घटनेची साक्षीदार असलेल्या तरुणी नेमकं काय घडलं, याबद्दल माहिती दिली.
काही सेकंदात सगळं संपलं
या हत्येची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शिवानी सिंह हिने सांगितले की, 'त्या दिवशी सर्व काही नेहमीसारखंच होतं. मी नेहमीप्रमाणे महाविद्यालयात पोहोचले. माझी बॅग ग्रंथालयात ठेवली आणि मैत्रिणींना वर्गात सोडायला जात होते. जिन्याजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होती आणि त्यांच्यामध्ये सूर्य प्रताप सिंह हा उभा होता."
"मी पुढे जाण्यासाठी पाऊल उचलले, तशी एक गोळी झाडण्यात आल्याचा आवाज आला. आधी काहीच कळलं नाही, पण सूर्य प्रताप कोसळला आणि सगळं कळलं. काही क्षणातच हे सगळं घडलं, त्यामुळे काय करायचं, हेच कुणाला कळले नाही", असे शिवानी सिंहने सांगितले.
एक गोळी झाडून तो पळाला होता, पण...
सूर्य प्रतापच्या हत्येचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात शिवानी सिंह काही अंतरावर उभी असल्याचे दिसत आहे. त्यावरून तिच्याबद्दलही शंका उपस्थित केल्या जात आहे.
त्याबद्दल शिवानी सिंह म्हणाली, "मी ते सगळे बघत बसले नव्हते. मी सूर्याला वाचवण्याच्या प्रयत्नात होते. पहिली गोळी झाडल्यानंतर आरोपी पळाला होता. आम्हाला वाटलं की आता वेळ आहे आणि आम्ही त्याला वाचवू शकतो. पण, तो पुन्हा परत आला."
"आरोपी परत आला आणि त्याने दुसऱ्यांदा गोळ्या झाडल्या. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. आरोपी पुन्हा परत येणार आहे, याची कल्पना आम्हाला आली असती, आम्ही सूर्याला लगेच तिथून दुसरीकडे नेले असते", असे शिवानीने सांगितले.
"आणखी काही जण सोबत आले असते आणि थोडी हिंमत केली असती, तर कदाचित असे घडले नसते. आम्ही प्रयत्न केला होता, पण सगळं काही इतकं अचानक घडलं की काहीच कळले नाही. माझ्यासोबत जर दोन-चार जण आले असते, तर आम्ही त्याला वाचवू शकलो असतो", असे शिवानीने या हत्या प्रकरणाबद्दल सांगितले.