सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 08:20 IST2025-12-31T08:19:33+5:302025-12-31T08:20:45+5:30
बम्बूरिया गावात राहणारा दीपू यादव सैन्य दलात भरती होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होता. पण..

सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य भरतीची तयारी करण्यासाठी आसामला गेलेल्या एका तरुणाने प्रेयसीच्या छळाला कंटाळून आपले आयुष्य संपवले आहे. कानपूरचा रहिवासी असलेल्या दीपू यादव याने डिब्रूगड येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी प्रेयसीने त्याला व्हिडिओ कॉल केला होता आणि त्याच वेळी हा टोकाचा प्रकार घडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
देशसेवेचं स्वप्न अधुरं राहिलं
कानपूरच्या महाराजपूर भागातील बम्बूरिया गावात राहणारा दीपू यादव सैन्य दलात भरती होण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करत होता. उत्तम तयारी व्हावी या उद्देशाने तो आसाममधील डिब्रूगड येथे गेला होता. मात्र, सोमवारी रात्री जेव्हा त्याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी पोहोचला, तेव्हा संपूर्ण गावावर शोककळा पसरली. आपल्या लाडक्या लेकाचा मृतदेह पाहून पालकांनी हंबरडा फोडला.
तीन वर्षांचे प्रेम अन् लग्नाचा जाच
दीपूचे त्याच्याच गावातील एका मुलीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या घरच्यांनी या नात्याला कडाडून विरोध केला होता. हा वाद मिटावा आणि दीपूने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे, यासाठी १० महिन्यांपूर्वी पालकांनी त्याला आसामला पाठवले होते. मात्र, दीपू आसामला गेल्यामुळे ती मुलगी धास्तावली होती. दीपू आता आपल्याशी लग्न करणार नाही किंवा ब्रेकअप करेल, अशी भीती तिला वाटत होती.
व्हिडिओ कॉलवरच घडला प्रकार
२७ डिसेंबर रोजी या प्रकरणाला हिंसक वळण मिळाले. मुलीने दीपूला व्हिडिओ कॉल केला आणि "जर तू माझ्याशी लग्न केले नाहीस, तर मी जीव देईन," अशी धमकी देण्यास सुरुवात केली. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे दीपू प्रचंड मानसिक तणावात होता. कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्या मुलीने त्याला इतके प्रवृत्त केले की, त्याने तिच्यासमोरच व्हिडिओ कॉल सुरू असताना गळफास लावून घेतला.
पोलिसांकडून तपास सुरू
महाराजपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी राजेश कुमार यांनी सांगितले की, दीपूच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दीपूच्या मोबाईलमधील शेवटचा कॉल हा त्या मुलीचाच होता, हे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस आता कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेजची कसून चौकशी करत आहेत. जर आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधित तरुणीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.