लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:47 IST2025-12-03T14:47:04+5:302025-12-03T14:47:33+5:30
प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला मुलीच्या कुटुंबीयांनी पकडून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर....

लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये एका प्रेम कहाणीचा अत्यंत वेदनादायक शेवट झाला आहे. प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला मुलीच्या कुटुंबीयांनी पकडून बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे, तर, त्याचा अपमान करण्यासाठी जातीवाचक शब्दांचाही वापर केला. हा अपमान आणि धमकी सहन न झाल्याने त्या तरुणाने घरी परत येऊन गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
मृत तरुणाचे नाव संदीप ऊर्फ गोलू असे असून, तो दिलदारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पचोखर गावाचा रहिवासी होता. संदीपने ३० नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबीयांना जमानिया पोलीस स्टेशन हद्दीतील फुल्ली गावात एका मित्राच्या लग्नाला जात असल्याचे सांगितले. याच फुल्ली गावात संदीपची प्रेयसी राहत होती, जिच्याशी तो नियमितपणे फोनवर बोलत असे. घटनेच्या दिवशीही त्याने प्रेयसीशी फोनवर बोलणे झाल्यावर तिला भेटण्यासाठी फुल्ली गाव गाठले.
दिली जीवे मारण्याची धमकी, केली जातीवाचक शिवीगाळ
संदीप आपल्या प्रेयसीला तिच्या घराच्या गल्लीत भेटून बोलत असतानाच, मुलीच्या कुटुंबियांची नजर त्यांच्यावर पडली. संतापाने लाल झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी ताबडतोब संदीपला पकडले. त्यांनी त्याला एका खोलीत कोंडून अमानुषपणे मारहाण केली. मारहाण करताना त्याचा अपमान करण्यासाठी त्यांनी जातीवाचक शिवीगाळ देखील केली. "जर आमच्या मुलीशी पुन्हा बोलला, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देऊन मुलीच्या घरच्यांनी त्याला नंतर सोडून दिले.
अपमान सहन न झाल्याने जीवन संपवले
कसाबसा सुटलेला संदीप घरी परतला. त्याने घडलेला सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला आणि नंतर तो आपल्या खोलीत गेला. वडिलांच्या आरोपानुसार, या अपमानामुळे आणि धमकीमुळे संदीप खूप दुखावला होता. याच मनःस्थितीत त्याने आपल्या खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. संदीपला फासावर लटकलेले पाहून कुटुंबात हंबरडा फुटला. संदीपच्या वडिलांनी २ डिसेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये प्रेयसीचे वडील आणि इतर कुटुंबीयांसह ६ लोकांसह आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली.
६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, पोलीस चौकशी सुरू
पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत त्वरित कारवाई केली आहे. तक्रारीच्या आधारावर, पोलिसांनी एससी/एसटी ॲक्टसह अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू केला आहे. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे.