हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; आरोपीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 13:41 IST2020-10-11T13:40:41+5:302020-10-11T13:41:52+5:30
Hathras Rape: हाथरस पीडितेचे कुटुंबीय लखनऊवा जात आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांची टीम त्यांना घेऊन जाणार आहे.

हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे; आरोपीवर गुन्हा दाखल
सामुहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार आणि त्यानंतर हाथरसमध्ये पोलिसांचा फौजफाटा ठेवत वाद ओढवून घेतलेल्या उत्तर प्रदेश सरकारने अखेर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. यावर सीबीआयने सूत्रे हाती घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तपासासाठी टीम बनविली आहे.
सीबीआयने एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. या आधी पीडितेच्या भावाने हाथरसच्या चंदपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 14 सप्टेंबरला आरोपीने त्याच्या बहिणीचा बाजरीच्या शेतामध्ये गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पीडितेच्या भावाने केला होता.
बलात्काराच्या घटनेला 27 दिवस झाले आहेत. आधी हाथरस पोलीस नंतर एसआयटी व आता सीबीआय असा तपास होत आहे. सध्या याची चौकशी एसआयटी करत होती. 14 सप्टेंबरला एसआयटी स्थापन करण्य़ात आली होती. त्यांनी गावातील 40 लोकांची चौकशी केली होती. हे लोक घटनेच्या वेळी आजुबाजुच्या शेतात काम करत होते. यामध्ये आरोपी आणि पीडितेचे कुटुंबीयही आहेत.
दरम्य़ान हाथरस पीडितेचे कुटुंबीय लखनऊवा जात आहेत. उत्तर प्रदेशपोलिसांची टीम त्यांना घेऊन जाणार आहे. 12 ऑक्टोबरला अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ बेंचसमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. यासाठी तिच्या घरातील ५ जण आणि काही नातेवाईक जाणार आहेत. डीआयजी शलभ माथूर यांनी पीडितेच्या गावी जाऊन परिस्थीतीची पाहणी केली आहे. 1 ऑक्टोबरला अलाहाबाद न्यायालयाने राज्याच्या सचिवांसह मोठ्या अधिकाऱ्यांना हाथरसचे जिल्हाधिकारी यांना बोलावले होते.