लग्नाचे फोटो इन्स्टाला टाकले म्हणून सासऱ्याने तोडले हात-पाय; मुलीचे लावून दिलं दुसरं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:31 IST2025-10-03T14:31:18+5:302025-10-03T14:31:31+5:30
पत्नीच्या दुसऱ्या लग्नानंतर सासरच्यांनी पहिल्या पतीला मारहाण केल्याची घटना हरियाणामध्ये घडली.

लग्नाचे फोटो इन्स्टाला टाकले म्हणून सासऱ्याने तोडले हात-पाय; मुलीचे लावून दिलं दुसरं लग्न
Haryana Crime: हरियाणाच्या सोनीपथमध्ये मारहाणीची विचित्र घटना समोर आली आहे. सोनीपतच्या गणौर पोलीस स्टेशन परिसरात प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणावर मुलीच्या कुटुंबाने जीवघेणा हल्ला केला. पानिपतच्या एका गावातील कुणालने गेल्या वर्षी कोमलशी रोहिणी न्यायालयात लग्न केले. लग्नानंतर दोघे एकत्र राहत होते, पण कोमल अचानक घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या कुटुंबाने उत्तर प्रदेशातील शामली येथे तिचे लग्न लावून दिले. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र त्याआधीच कुणालने असं काही तरी केलं ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला. कुणालने या लग्नासाठी आक्षेप घेतला होता ज्यामुळे कोमलच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण केली.
कुणालचे म्हणणे आहे की त्याने नुकतेच कोमलसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याचा राग आल्याने मुलीच्या कुटुंबाने त्याच्यावर हल्ला केला. २४ सप्टेंबर रोजी कुणाल आणि त्याचे वडील बाईकवरून घरी परतत असताना, बादशाही रोडवर दोन दुचाकींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्याला घेरले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. मुलीचे वडील सतीश आणि काका राकेश यात सहभागी होते. हल्लेखोरांनी कुणालचे हात आणि पाय तोडले, त्यानंतर त्याला पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले.
कुणाल आणि २१ वर्षीय कोमल गोस्वामी यांनी २६ जून २०२४ रोजी त्यांच्या कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध एका मंदिरात लग्न केले. पण त्यांचे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही. लग्नानंतर काही महिन्यांनीच कोमल तिच्या पालकांच्या घरी परतली. कोमलचे पालक सुरुवातीपासूनच माझ्या विरोधात होते. त्यांनी कोमलला तिच्या आजीच्या आजाराचे कारण सांगून परत बोलावले, असं कुणालने म्हटलं. त्यानंतर कोमलने कुणालविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आणि मासिक ३०,००० रुपयांच्या पोटगी मागतली. महत्त्वाचे म्हणज कुणाल महिन्याला फक्त १२,००० रुपये कमवतो हे कोमलला माहिती होते. त्यानंतर, कोमलच्या कुटुंबाने तिचे दुसरे लग्न लावल्याची बातमी समोर आली. त्यामुळे कुणालने इंस्टाग्रामवर त्याच्या आणि कोमलच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. ज्याचा कोमलचा कुटुंबियांना प्रचंड राग आला.
वडिलांसह घरी येत असताना कुणावर हल्ला करण्यात आला होता. कोमलचे वडील सतीश यांनी मला इन्स्टाग्रामवरील फोटो डिलीट करण्यास सांगितले. मी विचारले की घटस्फोटाशिवाय कोमल पुन्हा लग्न कसे करू शकते. मग त्यांनी माझ्यावर हल्ला केला, असं कुणालने सांगितले. हल्लेखोरांनी कुणालला काठ्या आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केली, ज्यामुळे त्याची हाडे मोडली. धक्कादायक म्हणजे, कोमलच्या वडिलांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता.