लग्नाच्या तासभर आधीच वधूची हत्या; साडी आणि पैशांवरून झालेल्या वादातून नवरदेवाने घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 09:03 IST2025-11-17T09:01:45+5:302025-11-17T09:03:56+5:30
गुजरातमध्ये लग्नाच्या तासभर आधीच नवरदेवाने होणाऱ्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली.

लग्नाच्या तासभर आधीच वधूची हत्या; साडी आणि पैशांवरून झालेल्या वादातून नवरदेवाने घेतला जीव
Gujarat Crime: आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात लग्नाची तयारी सुरू असताना, गुजरातच्या भावनगर शहरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्याच्यासोबत एक महिला लग्नबंधनात अडकणार होती, त्याच नवरदेवाने लग्नाच्याच सकाळी साडी आणि पैशांवरून झालेल्या क्षुल्लक वादातून तिची निर्घृण हत्या केली. लग्नाच्या एक तास आधी घडलेल्या या थरारक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. या घटनेमुळे
विवाह मंडपात रक्ताचे डाग
भावनगर शहरातील प्रभुदास झील येथील टेकरी चौक परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला. साजन बरैया (वय २४) आणि सोनी हिम्मत राठोड हे दोघे गेल्या दीड वर्षापासून एकत्र राहत होते आणि १५ नोव्हेंबर रोजी त्यांचे लग्न ठरले होते. बहुतेक विधी पार पडले होते आणि संध्याकाळी लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्या काहीच तास आधी, सकाळी साजन हा सोनीच्या घरी आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांमध्ये साडी आणि काही आर्थिक देवाणघेवाणीवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात साजनचे भान सुटले. त्याने घरात ठेवलेला लोखंडी पाईप उचलला आणि थेट सोनीच्या डोक्यावर वार केला. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिचे डोके क्रूरपणे भिंतीवर आपटले. या भीषण हल्ल्यात सोनी गंभीर जखमी झाली आणि दुर्दैवाने तिचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी फरार
हा भयानक गुन्हा केल्यानंतर साजन बरैयाने घटनास्थळावरून पळ काढला. एवढंच नाही, तर जाताना त्याने घरात तोडफोडही केली. गंगा जलिया पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
"कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता हे जोडपे एकत्र राहत होते. लग्नाच्या दिवशी साडी आणि पैशांवरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून साजनने पाईपने हल्ला केला आणि तिचे डोके भिंतीवर आपटले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला," असं पोलिसांनी सांगितले.
आरोपी साजन बरैया सध्या फरार असून, पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी तातडीने पथके तयार केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सोनीच्या हत्येच्या केवळ २४ तास आधी साजनचे एका शेजाऱ्याशी भांडण झाले होते आणि त्याच्या विरोधात एक वेगळी तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता चोवीस तासांत त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलीस त्याच्या ठिकाणांची तपासणी करत आहेत आणि त्याला लवकरच अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.