ओल्या टॉवेलवरून वाद अन् लिव्ह-इन पार्टनरचा शेवट; मणिपूरच्या तरुणीने दक्षिण कोरियन प्रियकराचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:55 IST2026-01-08T11:52:40+5:302026-01-08T11:55:19+5:30
नोएडामध्ये झालेल्या दक्षिण कोरियन नागरिकाच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

ओल्या टॉवेलवरून वाद अन् लिव्ह-इन पार्टनरचा शेवट; मणिपूरच्या तरुणीने दक्षिण कोरियन प्रियकराचा केला खून
Greater Noida Crime: किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे परिणाम किती भयानक असू शकतात, याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये आला आहे. केवळ एका ओल्या टॉवेलवरून झालेल्या वादातून एका तरुणीने आपल्या दक्षिण कोरियन लिव्ह-इन पार्टनरची चाकू भोसकून हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे.
मृतक तरुण, डक जी यूह हा दक्षिण कोरियाच्या चेओंगजू शहराचा रहिवासी होता. तो एका नामांकित मोबाईल कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होता. ग्रेटर नोएडाच्या सेक्टर १५० मधील एटीएस पायस हायडवेज सोसायटीत तो आपली लिव्ह-इन पार्टनर लुंजियाना पमाई सोबत राहत होता. शनिवारी रात्री उशिरा या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली.
ओल्या टॉवेलवरून पेटला वाद
पोलिस चौकशीत आरोपी पमाईने दिलेल्या माहितीनुसार, ती बाथरूममधून अंघोळ करून बाहेर आली होती. तिने चुकून डक यांचा वैयक्तिक टॉवेल वापरला. डक हे स्वच्छतेबाबत कडक होते आणि त्यांनी आपला टॉवेल ओला झालेला पाहून रागाच्या भरात पमाईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दोघांनीही मद्यप्राशन केले असल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली.
हृदयापर्यंत खुपसला चाकू
संतापलेली पमाई आपले सामान घेऊन घर सोडून जाण्यास निघाली असता डकने तिला अडवले. यादरम्यान भाजी कापण्याचा चाकू हातात आला. झटापटीत पमाईने डकच्या छातीवर डाव्या बाजूला चाकूने जोरदार वार केला. हा वार इतका खोल होता की चाकू थेट हृदयाला लागला आणि डक यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी तरुणी पोलिसांच्या ताब्यात
लुंजियाना पमाई ही मूळची मणिपूरमधील बिष्णुपूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून दक्षिण कोरियाच्या दूतावासालाही या घटनेची माहिती दिली आहे. केवळ एका टॉवेलच्या वादातून एका परदेशी नागरिकाचा असा अंत झाल्याने सोसायटीत भीतीचे वातावरण आहे.