आजी - आजोबाच बनले हैवान; पैश्याच्या हव्यासापोटी अल्पवयीन नातीला मध्य प्रदेशात विकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 21:36 IST2018-08-04T21:30:27+5:302018-08-04T21:36:43+5:30
आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल : मुलगी म्हणते - मला वाचव... मी खूप अडचणीत आहे

आजी - आजोबाच बनले हैवान; पैश्याच्या हव्यासापोटी अल्पवयीन नातीला मध्य प्रदेशात विकले
चिखलदरा (अमरावती) - आजी-आजोबांनी पैशांच्या हव्यासापोटी अल्पवयीन नातीला मध्य प्रदेशात विकल्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली. महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनीगुन्हा दाखल केला आहे.
मंजू जोगीलाल डोनल (वय - ४२, रा. भोपाळ, मध्य प्रदेश) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. या महिलेने मुलगी अदिती (वय - १६) हिला चिखलदरा येथील मरियमपूर भागात राहणाºया आरोपी आजी-आजोबा अनुक्रमे रुबू इलियास सावलकर (वय - ५६), इलियास जयराम सावलकर (वय - ६५) यांच्याकडे ठेवले होते. त्यानंतर फिर्यादी महिला भोपाळला निघून गेली, काही दिवसांनंतर परत आली असता, तिला घरात मुलगी अदिती दिसली नाही. तिने चौकशी केली असता, आरोपींनी तिचे लग्न झाल्याचे सांगितले. मुलीला फोनवर विचारले असता, तिने मला आजी-आजोबांनी विकले असून, मी खूप अडचणीत आहे, मला इथून घेऊन जा, असे म्हणत टाहो फोडला. यानंतर भोपाळ येथील शहाजहानाबाद पोलिसांत सदर महिलेने तक्रार दिली. मध्य प्रदेश पोलिसांनी घटनास्थळ चिखलदरा असल्याने ती चिखलदरा पोलीस ठाण्याकडे वर्ग केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून चिखलदरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा. दं. वि.कलम ३७०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.