ग्रामपंचायत माजी सदस्याच्या कानशिलात लगावली; पोलीस उपनिरीक्षकाची तत्काळ उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:46 IST2021-03-16T20:46:00+5:302021-03-16T20:46:38+5:30
Crime News : हिंजवडीतील प्रकार : पोलीस आयुक्तांकडे तक्रार

ग्रामपंचायत माजी सदस्याच्या कानशिलात लगावली; पोलीस उपनिरीक्षकाची तत्काळ उचलबांगडी
पिंपरी : ग्रामपंचायतचा माजी सदस्य निवेदन घेऊन पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षकाने त्याच्या कानशिलात लगावली. हिंजवडी येथे मंगळवारी (दि. १६) हा प्रकार घडला. पंडित आहिरे, असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी श्रीकांत दिलीप जाधव यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार जाधव हे हिंजवडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य आहेत. जाधव हे मंगळवारी निवेदन घेऊन पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी उपनिरीक्षक आहिरे कर्तव्यावर होते. जाधव यांनी उपनिरीक्षक आहिरे यांच्याकडे निवेदन दिले. ते निवेदन घेतले आहिरे यांनी घेतले. ‘ए चल निघ सूट’ असे बोलून आहिरे हे जाधव यांना म्हणाले. साहेब माझी काय चूक आहे, तुम्ही मला का ओरडता, असे जाधव यांनी आहिरे यांना विचारले. त्यामुळे चिडलेल्या आहिरे यांनी जाधव यांच्या कानशिलात लगावल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकारानंतर हिंजवडी ग्रामपंचायतच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर, पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे देखील तक्रार केली. तत्काळ कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले. सदरच्या घटनेबाबत चाैकशी करण्यात येईल. यात संबंधित पोलीस उपनिरीक्षकाची चुकी असल्यास तसा कसुरी अहवाल पाठविण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.
गेल्या वर्षी झाली होती बदली
दरम्यान, पोलीस आयुक्तालयांतर्गत उपनिरीक्षकांच्या डिसेंबर २०२० मध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात पंडीत आहिरे यांची हिंजवडी पोलीस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली होती. मात्र हिंजवडीतून रिलिव्ह केले नसल्याने उपनिरीक्षक आहिरे हे तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात रुजू झाले नव्हते. मंगळवारी झालेल्या प्रकारानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर आहिरे यांना तत्काळ हिंजवडी पोलीस ठाण्यातून तत्काळ रिलिव्ह करण्यात आले असून, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.