शरीरात लपवले सव्वाकोटीचे सोने; विमानतळावर एकाला अटक; बँकॉकहून आलेल्या प्रवाशावर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 08:02 IST2025-02-28T08:02:06+5:302025-02-28T08:02:20+5:30
शेख सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना होती. अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली.

शरीरात लपवले सव्वाकोटीचे सोने; विमानतळावर एकाला अटक; बँकॉकहून आलेल्या प्रवाशावर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँकॉकहून मुंबईत पत्नीसह आलेल्या गुजरातच्या एका प्रवाशाला सोने तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. त्याने शरीरामध्ये सव्वाकोटी रुपयांचे सोने लपवले होते. मोहम्मद वासिफ शेख, असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव आहे.
शेख सोन्याची तस्करी करत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना होती. अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली.
ते दोघेही ग्रीन चॅनलमधून बाहेर पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्याकडे शुल्क भरण्यासारखे काही सामान आहे का, याची विचारणा केली. त्यावेळी त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. मात्र, त्याच्या उत्तराने समाधान न झाल्याने अधिकाऱ्यांनी त्याची एक्स-रे चाचणी केली. त्यात त्याने गुदद्वारामध्ये सोने लपवल्याचे आढळले.
पत्नीवर गुन्हा नाही...
आरोपीच्या पत्नीच्या सामानातदेखील काही सोने सापडले. मात्र, या सोन्याच्या तस्करीत आपल्या पत्नीचा काहीही संबंध नाही.
आपण केवळ तिला एक पॅकेट दिले आणि ते बॅगेत ठेवण्यास सांगितले. त्यात काय आहे, याची माहिती तिला नव्हती, असे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले. त्याच्या कबुलीनंतर अधिकाऱ्यांनी केवळ त्याच्यावरच तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही. एका व्यक्तीने या तस्करीसाठी ४० हजार रुपये देणार असल्याचे सांगितल्यामुळे आपण तस्करी केल्याची कबुलीदेखील त्याने अधिकाऱ्यांना दिली.