हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:29 IST2025-05-19T17:28:41+5:302025-05-19T17:29:16+5:30
रहमतीने तिच्या बहिणीचा ११ वर्षांचा मुलगा साहिलला मारलं.

फोटो - nbt
गाझियाबाबमध्ये एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी रहमती खातून नावाच्या महिलेला अटक केली आहे. रहमतीने तिच्या बहिणीचा ११ वर्षांचा मुलगा साहिलला मारलं. तिनेच लहानपणापासून साहिलला वाढवलं होतं. रागाच्या भरात तिने त्याला मारहाण केली आणि त्याचा गळा दाबून खून केला, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. साहिलने रहमतीच्या किराणा दुकानातून पैसे चोरले होते, त्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे.
लोणी एसीपी सिद्धार्थ गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहमती खातून दौलत नगर कॉलनीत राहते. बहिणीचा ११ वर्षांचा मुलगा साहिल तिच्यासोबत राहत होता. साहिल हा अजमती हिचा मुलगा होता. रहमतीला मूल नव्हतं. म्हणून अजमतीने तिची दोन्ही मुलं रहमतीला दिली होती. अजमती बिहारमध्ये राहते. रहमतीचा पती रझी अहमद याचं ३ वर्षांपूर्वी निधन झाले. यानंतर अजमती तिच्या मुलीला परत घेऊन गेली, पण तिने तिचा मुलगा साहिलला रहमतीकडेच ठेवलं.
पोलीस चौकशीदरम्यान, रहमतीने हत्या का केली ते सांगितलं आहे. तिला मुलं नाही. म्हणूनच तिच्या बहिणीने जवळपास ९ वर्षांपूर्वी २ वर्षांचा साहिल तिला दिला होता. साहिल खूप खोडकर होता आणि शाळेतही जात नव्हता. कधीकधी तो काही दिवस गायब असायचा. रहमतीला त्याच्या त्रासाला कंटाळली होती.रहमतीने किराणा दुकान सुरू केलं होतं. साहिल अनेकदा त्या दुकानातून पैसे चोरायचा.
१४ मे रोजी संध्याकाळी साहिलने दुकानातून काही पैसेही चोरले होते. जेव्हा रहमतीला हे कळलं तेव्हा तिने साहिलला मारहाण केली. ती खूप रागावली आणि तिने साहिलचा गळा दाबून खून केला. स्थानिक लोकांनी त्याला डॉक्टरकडे नेलं. मात्र डॉक्टरांनी साहिलला मृत घोषित केलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये साहिलचा मृत्यू मारहाण आणि त्याच्या मानेवर झालेल्या जखमांमुळे झाल्याचं उघड झालं आहे.