गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 08:56 IST2025-11-24T08:55:07+5:302025-11-24T08:56:29+5:30
Anant Garje Arrested: रात्री १ वाजताच्या सुमारास वरळी पोलिसांनी अटक केली

गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
Anant Garje Arrested: राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय्य सहायक अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या (gauri palve garje death case) केली. मुंबईतील राहत्या घरात ही दुर्दैवी घटना घडली. अवघ्या काही महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. मुलीच्या आत्महत्येनंतर गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर गंभीर आरोप केले. अनंत समोरच गौरीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. तसेच अनंत यांचे अनैतिक संबंध असल्याचे समजल्याने गौरी खचली असेही काही सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अनंत गर्जेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री १ वाजताच्या सुमारास त्यांना वरळी पोलिसांनी अटक केली.
अनंत गर्जे यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना वरळी पोलिस स्थानकात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. अनंत गर्जेंच्या पत्नी गौरी पालवे-गर्जे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेंवर केला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आज अनंत गर्जेंना कोर्टात पोलीस कोठडीसाठी हजर केले जाणार आहे.
वरळी पोलीस ठाण्यात कुटुंबीयांचा आक्रोश
शनिवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गौरी पालवे यांच्या कुटुंबीयांनी थेट मुंबईतील वरळी पोलीस ठाणे गाठले आणि अनंत गर्जेंसह त्याच्या कुटुंबीयांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कुटुंबीय या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसले. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ते पोलीस ठाण्यातून हलण्यास तयार नव्हते. अखेर पोलिसांच्या त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला.