Sangli: डॉक्टरच्या घरावर छापा टाकणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्यांची टोळी कोल्हापूरची, तरुणीसह तिघे जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 13:15 IST2025-09-19T13:14:36+5:302025-09-19T13:15:59+5:30
चौघांचा शोध सुरु, सर्व दागिने व रोकड हस्तगत, पोलिसांना ४८ तासांत यश

Sangli: डॉक्टरच्या घरावर छापा टाकणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्यांची टोळी कोल्हापूरची, तरुणीसह तिघे जेरबंद
सांगली : प्राप्तिकर अधिकारी असल्याचे भासवून कवठेमहांकाळ येथील डॉक्टरांच्या घरावर छापा टाकणाऱ्या टोळीतील तिघांना पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये एका तरुणीचा समावेश आहे. त्यांनी नेलेली रोकड व सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ४८ तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
एकूण सात जणांच्या टोळीने ही बोगस छापेमारी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातील दीक्षा राष्ट्रपाल भोसले (वय २५, रा. काकडे पार्क, चिंचवड, पुणे), पार्थ महेश मोहिते (वय २५, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) आणि साई दीपक मोहिते (वय २३, रा. प्रगतीनगर, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून १५ लाख ५ हजार रुपयांची रोकड आणि १ किलो ४१० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व बिस्किटे हस्तगत करण्यात आली.
उर्वरित चौघा संशयितांची नावे अशी : महेश रघुनाथ शिंदे (रा. जयसिंगपूर, सध्या रा. घाटकोपर, मुंबई), अक्षय लोहार (रा. संकेश्वर, जि. बेळगाव), शकील पटेल (रा. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) आणि आदित्य मोरे (रा. रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे चौघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांना जेरबंद करण्यात लवकरच यश येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.
गेल्या रविवारी (दि. १४) रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान तीन पुरुष व एका महिलेने आपण मुंबईतील प्राप्तिकर कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या गुरुकृपा रुग्णालय व राहत्या घरावर छापा टाकला आणि घरात ठेवलेली रोकड, सोन्याचे दागिने व बिस्किटे घेऊन ते पसार झाले होते.
पोलिसांचे ४८ तास अविश्रांत परिश्रम..
छाप्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयितांचा माग काढला. त्यांची रेखाचित्रे तयार केली. ही रेखाचित्रे व तांत्रिक माहितीच्या आधारे सात संशयितांपैकी चौघांपर्यंत पोहचले. सुरुवातीला दीक्षा भोसले पोलिसांच्या हाती लागली. तिने साथीदारांचा ठावठिकाणा सांगितला. त्यानुसार उर्वरित सहा जणांपैकी पार्थ मोहिते व साई मोहिते यांना सापळा रचून हातकणंगले येथून पोलिसांनी जेरबंद केले.