सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 01:02 IST2025-09-09T00:58:23+5:302025-09-09T01:02:01+5:30

या टाेळीविराेधात विविध गंभीर स्वरूपाचे २५ गुन्हे दाखल आहेत.

Gang of criminals in Sarai; MCOCA, Latur police crackdown against five people | सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

लातूर : सराईत गुन्हेगार अजिंक्य मुळे याच्यासह टोळीतील गुन्हेगारांविराेधात लातूर पाेलिसांकडून मकोका (MCOCA) कायद्यानुसार कारवाईचा बडगा साेमवारी उगारण्यात आला आहे. या टाेळीविराेधात विविध गंभीर स्वरूपाचे २५ गुन्हे दाखल आहेत.

पाेलिसांनी सांगितले, ११ मार्च २०२५ रोजी अंबाजोगाई रोडवरील एक बार, त्यासमोर रस्त्यावरच अजिंक्य निळकंठ मुळे, बालाजी राजेंद्र जगताप, अक्षय माधवराव कांबळे, प्रणव प्रकाश संदीकर, साहिल रशीद पठाण, नितीन शिवदास भालके आणि विधिसंघर्षग्रस्त बालकाने फिर्यादी अजय बाबासाहेब चिंचोले याला बारमधील दारूचे बिल दे म्हणून, पैशाची मागणी केली. फिर्यादीने बिल देण्यास नकार दिला असता, फिर्यादीला आरोपींनी जिवे मारण्याचे उद्देशाने चाकू, लोखंडी कत्ती, रॉड, बीअर बाटलीने मारहाण केली. फिर्यादीला अर्धनग्न करून रस्त्यावरच फरफटत ओढत २,२०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. याबाबत शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. गुन्ह्यातील आरोपी व बालकाच्या वडिलांच्या ताब्यातून हत्यार, चाकू, लोखंडी कत्ती, रॉड, रोख रक्कम जप्त केली हाेती.
आरोपी अजिंक्य निळकंठ मुळे, बालाजी राजेंद्र जगताप, अक्षय माधवराव कांबळे, प्रणय प्रकाश संदीकर, साहिल रशीद पठाण यांना अटक केली हाेती. विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत चाैकशी केली असता, त्याच्याविरुद्ध लातुरात गंभीर स्वरूपाचे २५ गुन्हे दाखल असल्याचे समाेर आले. त्याच्याविराेधात नांदेडचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या परवानगीने माेक्का कलमात वाढ केली. मकोका (MCOCA) कायद्यान्वये कलम वाढविण्यात आल्यानंतर लातूर विशेष मकोका न्यायालयात दाेषाराेपपत्र दाखल करण्यास अपर पोलिस महासंचालकांनी मंजुरी दिली. यातील अजिंक्य निळकंठ मुळे, अक्षय माधवराव कांबळे, प्रणव प्रकाश संदीकर, साहिल रशीद पठाण आणि नितीन शिवदास भालके यांच्याविराेधात माेक्कानुसार कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी रणजित सावंत, डीवायएसपी समीरसिंह साळवे, पो.उप.नि. हनुमंत कवले यांनी केली. तर वाजीद चिकले, धैर्यशील मुळे, पांडुरंग सगरे, मोहन सुरवसे यांनी तपासामध्ये मदत केली.

Web Title: Gang of criminals in Sarai; MCOCA, Latur police crackdown against five people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.