इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला फसविणाऱ्या भामट्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 19:29 IST2018-12-14T19:26:34+5:302018-12-14T19:29:36+5:30
मुंबई - इन्स्टाग्रामवर झालेली ओळख मैत्रीत बदलली. नंतर मैत्रीत पडून लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अशा प्रकारे 21 वर्षीय तरुणाने गोडीगुलाबीने 15 वर्षाच्या मुलीला आपल्या जाळय़ात ओढले. त्याने ...

इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात; अल्पवयीन मुलीला फसविणाऱ्या भामट्याला अटक
मुंबई - इन्स्टाग्रामवर झालेली ओळख मैत्रीत बदलली. नंतर मैत्रीत पडून लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. अशा प्रकारे 21 वर्षीय तरुणाने गोडीगुलाबीने 15 वर्षाच्या मुलीला आपल्या जाळय़ात ओढले. त्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर तो तिला खंडणीसाठी धमकावू लागला. त्याने अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करून उलट तिलाच फसविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोंगरी पोलिसांनी २१ वर्षीय भामट्याला बेड्या ठोकल्या.
जुलै महिन्यात डोंगरी परिसरात राहणाऱ्या मंजू (वय 15) (बदललेले नाव) या मुलीची भायखळ्यात राहणाऱ्या मेहफुज मन्सुरी (वय 21) या तरुणाशी इन्स्टाग्रामवर परिचय झाला. त्यानंतर दोघांमध्ये नियमित चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगनंतर त्यांची गाढ मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. गोडीगुलाबीने मेहफुजने मंजुला आपल्या जाळ्यात ओढले. मग वेगवेगळी आमिषे दाखवून मेहफुजने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केली. त्यावेळी तिला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने मंजूसोबत व्हिडीओ आणि फोटो काढले. काही दिवस मेहफुजने तिच्याकडे 14 हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दे नाहीतर तुझे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल करेन अशी धमकी देऊ लागला. यामुळे घाबरलेल्या मंजूने घडला प्रकार पालकांना सांगून डोंगरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. नंतर मंजूच्या तक्रारीनुसार डोंगरी पोलिसांनी बलात्कार, खंडणी आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मेहफुज अन्सारीला अटक करण्यात आली. मेहफुज बारावीपर्यंत शिकलेला असून बेरोजगार आहे. मेहफुजने मंजूच्या गैरफायदा घेत तिचे लैंगिक शोषण करण्याबरोबर पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार वेळीच उघडकीस आला आणि पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.