मित्रांची पार्टी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले दोन अनोळखी व्यक्ती; हत्याकांडाच्या दिवशी प्रियंकासोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:31 IST2025-12-03T11:31:01+5:302025-12-03T11:31:49+5:30
एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रियंका कुमारी नावाच्या विवाहित तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.

AI Generated Image
बिहारची राजधानी पाटणा पुन्हा एकदा एका हादरवून टाकणाऱ्या गुन्हेगारी घटनेने चर्चेत आली आहे. राजीव नगर परिसरात एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या प्रियंका कुमारी नावाच्या विवाहित तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. तिच्या डोक्यावर विटा किंवा अन्य एखाद्या जड वस्तूने अनेक वार करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, मृत तरुणीचा पती मेघनाथ याने थेट आपल्या दोन प्लंबर मित्रांवरच हत्येचा आरोप लावला आहे. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून ही क्रूर घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नेमके काय घडले?
समस्तीपूरच्या तीसवाडा गावची रहिवासी असलेली प्रियंका कुमारी ही पेंटर असलेल्या पती मेघनाथसोबत राजीव नगरमध्ये राहत होती. मेघनाथच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी त्याचे दोन मित्र प्रकाश उर्फ जेपी आणि लालू उर्फ मुखिया यांनी त्याला इंद्रपुरी येथील फ्लॅटवर एका पार्टीसाठी बोलावले. मेघनाथ फ्लॅटवर पोहोचल्यावर दोघांनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मेघनाथने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर मित्रांनी स्वतःच दारू मागवली आणि दारूच्या नशेत त्यांच्यातील वाद आणखी वाढला.
आधी पतीला बेदम मारहाण, नंतर पत्नीवर हल्ला!
त्यांच्यातील वाद इतका वाढला की लालू आणि जेपी यांनी मेघनाथला बेदम मारहाण केली. यानंतर मेघनाथने तातडीने आपल्या लहान भावाला मदतीसाठी बोलावले. दोन्ही भावांनी मिळून लालू आणि जेपीलाही मारहाण केली. या मारामारीनंतर काही वेळातच दोघेही आरोपी तिथून निघून गेले. मेघनाथने पोलिसांना सांगितले की, तो रॅपिडो बुक करून आपल्या घरी परतत असताना, दोन्ही आरोपी आधीच घरी पोहोचले. जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा समोरचे दृश्य पाहून तो हादरून गेला. त्याची पत्नी प्रियंका घराच्या दाराजवळ रक्ताच्या थारोळ्यात अचेत अवस्थेत पडलेली होती.
रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
प्रियंकाला तातडीने आयजीआयएमएस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे पहाटे तीनच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेघनाथच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी प्रियंकाला फोन करून बाहेर बोलावले आणि त्यानंतर तिच्यावर प्राणघातक हल्ला केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि ‘स्ट्रीट लाईट’चे रहस्य
या प्रकरणाच्या तपासात काही संशयास्पद बाबी समोर आल्या आहेत. घटनेच्या आधी गल्लीतील स्ट्रीट लाईट जाणूनबुजून बंद करण्यात आली होती. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण गल्ली अंधारात बुडलेली दिसत आहे. या फुटेजमध्ये हल्ल्याच्या अगदी आधी दोन तरुण गल्लीत जाताना दिसत आहेत. मात्र, अंधारामुळे त्यांची ओळख स्पष्ट होऊ शकलेली नाही. पोलिसांना घटनास्थळी विटा मिळालेल्या नाहीत, पण ठाणेदार सोनू कुमार यांनी सांगितले की, प्रियंकावर नक्कीच एखाद्या जड आणि कठोर वस्तूने हल्ला करण्यात आला आहे.
आरोपी फरार, पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी तपास गतिमान करत मेघनाथ आणि प्रियंका दोघांचेही मोबाईल फोन जप्त केले आहेत. सध्या प्रकाश उर्फ जेपी आणि लालू उर्फ मुखिया हे दोन्ही आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. विविध ठिकाणी धाडी टाकण्यासोबतच 'टेक्निकल सर्व्हेलन्स'च्या मदतीने आरोपींचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणामागे दारूच्या नशेत झालेला वाद आणि वैयक्तिक वैर असल्याचे पोलिसांचे प्राथमिक मत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांनंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.