४५ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी आणि विम्याचे दोन कोटी हडप करण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या मित्राला गाडीत जिवंत जाळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. त्याने युट्यूबवरून विम्याचे पैसे हडपण्याची पद्धत शिकली. त्यानंतर तरुणाने त्याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली. या कटात सहभागी असलेल्या पत्नीला गाडीत अर्धवट जळालेला मृतदेहही मिळाला आणि अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
एसपी अरुण कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर पोलीस स्टेशन परिसरातील सिक्री अमनजवळ गाडीत जळालेला मृतदेह आढळला. खबऱ्याच्या माहितीवरून, एसओजी आणि राजापूर पोलीस स्टेशन पोलिसांच्या पथकाने रायपुराच्या आनंदपूर गावात एका घरावर छापा टाकला. येथे मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यातील थाना जावा कानपुरा येथील रहिवासी सुनील सिंग पटेल त्याची पत्नी हेमा सिंगसह सापडले. सुनीलला जिवंत पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
पोलिस चौकशीदरम्यान दोघांनीही सांगितलं की त्यांनी ब्युटी पार्लरसाठी ४५ लाखांचे कर्ज घेतलं होतं. नंतर त्यांनी कर्ज घेऊन हार्वेस्टर खरेदी केले. कर्ज फेडण्यासाठी त्यांनी स्वतःचा दोन कोटींचा विमा काढला होता. त्यांनी ब्युटी पार्लरचे तीन हप्ते आणि हार्वेस्टरचा एक हप्ता भरला होता. उर्वरित हप्ते भरण्यात त्यांना अडचण येत असताना, पती-पत्नीने असा कट रचला. त्यांनी युट्यूबवर अशा केसेस शोधल्या ज्यामध्ये कर्ज न भरण्याच्या पद्धती सांगितल्या गेल्या.
युट्यूबवरून पद्धत जाणून घेतल्यानंतर, आरोपी सुनील पटेलने एका तरुणाला आपला मित्र बनवलं, नंतर त्याला गाडीत घेऊन गेला आणि त्याला इतकी दारू पाजली की तो बेशुद्ध झाला. त्यानंतर, त्याने त्याला गाडीसह जिवंत जाळलं आणि पळून गेला. यानंतर पत्नीने सुनीलचा मृत्यू झाल्याचं सांगत अंत्यसंस्कार केले. संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला आणि सुनीलला रेवा येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी सापडला. त्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.