मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:11 IST2025-05-16T14:09:11+5:302025-05-16T14:11:35+5:30
पटनाच्या आनंदपुरी भागात एका तरुणाने आपल्याच मैत्रिणीची क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.

मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
पटनाच्या आनंदपुरी भागात एका तरुणाने आपल्याच मैत्रिणीची क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंदपुरी भागातील संजना नावाच्या तरुणीची तिच्या घरातच हत्या झाली आहे. आरोपीने आधी संजनाच्या शरीरावर आणि गळ्यावर वार केले आणि नंतर तिच्या घरातील गॅस सिलेंडरचा पाईप काढून त्याला आग लावून, तिला जिवंत जाळलं. या घटनेत २८ वर्षीय संजनाचा अतिशय दुर्दैवी अंत झाला. संजनासोबत इतका क्रूर अपराध तिच्या जवळच्या मित्रानेच केल्याचे समोर आले आहे.
संजनाची हत्या केल्यानंतर तिचा मित्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला असून, फरार आरोपीच्या शोधात अनेक ठिकाणी छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे.
नेमकं काय झालं?
मूळ मुझफ्फरपूरमधील साक्रा येथील रहिवासी असलेली २८ वर्षीय संजना कुमारी आनंदपुरीतील मनोरमा अपार्टमेंटच्या मागे असलेल्या निवृत्त सिंचन विभागाचे अधिकारी राजेश्वर प्रसाद यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर एकटी राहत होती. संजनाने मुझफ्फरपूरच्या एमडीडीएम कॉलेजमधून बीबीए केले होते आणि बिहारमध्ये सीजीएल (कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल) नोकरीसाठी तिची निवड झाली होती. ती पुढच्या महिन्यात नोकरीवर रुजू होणार होती. संजनाचे वडील मिथिलेश कुमार शेतकरी आहेत आणि तिला दोन भाऊ आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज कुमार दुपारी १ वाजताच्या सुमारास बॅकपॅक घेऊन संजनाच्या फ्लॅटवर आला. दोघेही चांगले मित्र होते, पण त्यांच्यात कशावरून तरी वाद झाला होता. त्यांच्यातील वाद इतका वाढला की, सूरजने स्वयंपाकघरातून चाकू उचलला आणि संजनाच्या मानेवर, पोटावर आणि पाठीवर अनेक वार केले, ज्यामुळे तिला रक्तस्त्राव झाला. यानंतर, सूरजने स्वयंपाकघरातून गॅस सिलिंडर आणला आणि त्याचा पाईप कापला आणि गळती झालेल्या गॅसने संजनाला जिवंत जाळून टाकले. ही क्रूर हत्या केल्यानंतर, सूरजने पहाटे ३ वाजता संजनाचा मोबाईल, लॅपटॉप आणि फ्लॅटच्या चाव्या घेऊन तिथून पळ काढला.
फ्लॅटमध्ये काम करणारी मोलकरीण तिथे पोहोचली, तेव्हा ही घटना उघडकीस आली. तिने संजनाचा जळालेला मृतदेह पाहिला आणि आरडाओरडा केला, त्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सूरज कुमार फ्लॅटमधून पळून जाताना दिसला होता.
पोलिसांचा तपास सुरू!
एसके पुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरुवातीच्या तपासात हत्येमागील हेतू स्पष्ट झाला नाही, परंतु सूरज आणि संजना यांच्यातील वाद हे मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी सूरजचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत, ज्याचा तपास सुरू आहे.