चार वर्षांचा संसार आणि चिमुकलं बाळ... तरीही प्रियकरासोबत पळाली!'एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर'चा थरार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 10:25 IST2026-03-27T10:23:44+5:302026-03-27T10:25:55+5:30
उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका प्रियकराने विवाहित प्रेयसीला तिच्या पतीसमोरून पळवून नेले. पत्नीने दागिने आणि रोख रक्कमही सोबत नेली आहे.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात एका तरुणाने पतीच्या डोळ्यादेखत त्याच्या पत्नीला घरातून पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे, प्रियकराने पतीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि भरल्या संसारातून विवाहित प्रेयसीला घेऊन तो निघून गेला. 'माझ्या देखतच तो तिला घेऊन गेला आणि मी हतबल होऊन पाहत राहिलो', अशी आर्त हाक आता हा पीडित पती पोलीस प्रशासनाकडे मारत आहे.
काय आहे नेमकी घटना?
बिसंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हा खळबळजनक प्रकार घडला. पीडित पतीच्या तक्रारीनुसार, आरोपी जिलेदार खान हा अचानक त्याच्या घरात घुसला. त्याने २४ वर्षीय विवाहित महिलेला आपल्यासोबत येण्यासाठी धमकावले. जेव्हा पतीने आपल्या संसारासाठी विरोध केला, तेव्हा आरोपीने त्याला अश्लील शिवीगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या दहशतीमुळे घाबरलेला पती हतबल झाला आणि आरोपी त्याच्या पत्नीला घेऊन फरार झाला.
एका आठवड्यात दुसऱ्यांदा पलायन!
या प्रकरणातील सर्वात चक्रावून टाकणारी बाब म्हणजे ही महिला पहिल्यांदा पळालेली नाही. पोलीस रेकॉर्डनुसार, १८ मार्च रोजी सुद्धा ही महिला अचानक बेपत्ता झाली होती. पतीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मोठ्या कष्टाने २३ मार्च रोजी तिला शोधून काढले आणि पतीच्या स्वाधीन केले. संसार पुन्हा रुळावर येईल असे वाटत असतानाच, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ मार्चला प्रियकर पुन्हा घरात घुसला आणि तिला घेऊन गेला.
रोख रक्कम आणि दागिनेही लंपास
पीडित तरुणाचे लग्न चार वर्षांपूर्वी झाले असून त्यांना एक लहान मूलही आहे. पतीने आरोप केला आहे की, पत्नी केवळ प्रियकरासोबत गेली नाही, तर घरात ठेवलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोठी रोख रक्कमही सोबत घेऊन गेली आहे. आरोपीने दिलेल्या धमकीमुळे पती इतका हादरला होता की, घटना घडली तेव्हा तो आरडाओरडाही करू शकला नाही.
पोलीस कारवाई सुरू
बिसंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी राममोहन राय यांनी सांगितले की, पीडित पतीच्या तक्रारीवरून आरोपी जिलेदार खान याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. प्रेमप्रकरण की अन्य काही दबाव, या सर्व बाजूंनी पोलीस आता तपास करत आहेत.