सरकारी क्वार्टरमध्ये 'ट्रिपल मर्डर'; वन अधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना संपवून घरामागे पुरले, १० दिवस केलं नाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 09:20 IST2025-11-18T09:12:33+5:302025-11-18T09:20:22+5:30
गुजरातमध्ये वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने पत्नी आणि दोन मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

सरकारी क्वार्टरमध्ये 'ट्रिपल मर्डर'; वन अधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना संपवून घरामागे पुरले, १० दिवस केलं नाटक
Gujarat Crime: गुजरातच्या वन विभाग आणि पोलीस दलाला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. गुजरातच्या भावनगरमध्ये तैनात असलेल्या एका सहाय्यक वनसंरक्षक अधिकाऱ्याला त्याची पत्नी आणि दोन लहान मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. वन अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांचे गूढपणे बेपत्ता होणे निर्घृण हत्या असल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे तिच्या पतीला अटक करण्यात आली. आरोपी पतीने भावनगरमधील त्याच्या घराजवळील खड्ड्यात तिघांचे मृतदेह फेकले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अधिकारी शैलेशभाई बाचूभाई खांभाळा याने आपल्या सरकारी निवासस्थानाच्या मागे गोपनीयरीत्या खणलेल्या दोन खड्ड्यांमध्ये पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह पुरले होते. या तिहेरी हत्याकांडाला त्याने सुमारे आठवडाभर पत्नी आणि मुले बेपत्ता असल्याचे प्रकरण म्हणून भासवण्याचा प्रयत्न केला. वन अधिकाऱ्याने १० दिवसांपूर्वी तिघे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी भरतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांना शैलेशभाईवर संशय आला. वन अधिकाऱ्याची सखोल चौकशी केली असता हे प्रकरण समोर आले.
कट रचून घडवले हत्याकांड
पोलिसांच्या तपासानुसार, वन विभागाच्या कॉलनीत राहणाऱ्या खांभाळाने पत्नी नयनाबेन (४२), मुलगी पृथ्वी (१३) आणि मुलगा भव्य (९) यांची ५ नोव्हेंबरच्या रात्री आणि ६ नोव्हेंबरच्या पहाटे दरम्यान हत्या केली. यानंतर त्याने ७ नोव्हेंबर रोजी भारतनगर पोलीस ठाण्यात कुटुंबाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली.
नयनाबेनच्या मेसेजेसवरून संशय
शैलेशने पोलिसांना सांगितले होते की सुरक्षा रक्षकाने त्याला सांगितले होते की ते तिघे एका ऑटोमधून कुठेतरी गेले होते. पण पोलिसांनी सुरक्षा रक्षकाची चौकशी केली तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. यामुळे पोलिसांना प्रथम शैलेशवर संशय आला. यानंतर, नयनाबेनचा मोबाईल तपासला असता, त्यात अनेक मेसेजेस आढळले, जे नयनाबेनने शैलेशला पाठवले होते. मोबाईल लोकेशन तपासले असता, नयनाबेन आणि शैलेशच्या मोबाईलचे लोकेशन एकच असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांना असा संशय आला की घटनेनंतर शैलेशने नयनाबेनच्या मोबाईलवरून स्वतःला मेसेजेस पाठवले असावेत.
त्यानंतर, पोलिसांनी शैलेशच्या मोबाईल कॉल डिटेल्स तपासल्या. त्याने ७ ते ८ नोव्हेंबर दरम्यान एका नंबरवर अनेक कॉल केले होते. जेव्हा त्या नंबरवर संपर्क साधला तेव्हा तो नंबर वन विभागाचे आरएफओ गिरीशभाई वानिया यांचा असल्याचे निष्पन्न झाले. गिरीशभाईंनी पोलिसांना सांगितले की या काळात शैलेशने त्याला त्याच्या क्वार्टरच्या मागे एक मोठा खड्डा खणण्यास आणि नंतर तो भरण्यास सांगितले होते.
तक्रार दाखल करण्याच्या चार दिवस आधी, २ नोव्हेंबर रोजी खांभाळाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आपल्या निवासस्थानाच्या मागे दोन मोठे खड्डे खणायला लावले होते. नंतर कर्मचाऱ्यांकडून लगेच ते खड्डे मातीने बुजवून जमीन सपाट करून घेतली. सापाची भीती असल्याचे सांगून त्याने कर्मचाऱ्यांना त्या भागापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.
मृतदेह सापडले
१६ नोव्हेंबर रोजी उपअधीक्षक, पंच साक्षीदार, व्हिडिओग्राफर आणि फॉरेन्सिक टीमच्या उपस्थितीत पोलिसांनी खांभाळाच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस असलेले खड्डे खोदण्यास सुरू केले. खोदकाम सुरू होताच लगेचच दुर्गंधी येऊ लागली आणि काही वेळातच तीनही मृतदेह आढळले.