Five racketeers of fake bailiffs racket; Planning | बनावट जामीनदारांच्या रॅकेटचे पाच जण सूत्रधार; नियोजनपूर्वक करायचे काम
बनावट जामीनदारांच्या रॅकेटचे पाच जण सूत्रधार; नियोजनपूर्वक करायचे काम

ठळक मुद्देबनावट कागदपत्रांद्वारे गुन्हेगारांना जामीन  टोळीचा म्होरक्या मुश्ताक शेख  

औरंगाबाद : बनावट कागदपत्रांद्वारे गुन्हेगारांचा जामीन घेणाऱ्या रॅकेटमध्ये पाच आरोपी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, प्रत्येकावर वेगवेगळी बनावट कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या टोळीने एकाच्या ऐपत प्रमाणपत्रावर अनेक गुन्हेगारांचा जामीन घेतल्याचेही तपासात उघडकीस आले आहे.

बनावट कागदपत्रांआधारे गुन्हेगारांचा जामीन घेणाऱ्या रॅकेटचा ७ नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १७ जणांना अटक  केली आहे. शेख मुश्ताक शेख मुनाफ गेल्या काही वर्षांपासून हे रॅकेट चालवीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या रॅकेटमधील दुसरा आणि महत्त्वाचा आरोपी अयूब खान रमजान खान आहे. तो न्यायालयातील एजंट होता. त्याचे काम न्यायालयात हजर राहणे आणि अटकेतील ज्या आरोपींकडे जामीनदार नाही अशा गुन्हेगारांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना भेटून जामीनदाराची व्यवस्था मुश्ताक करील, असे तो सांगायचा. 

गुन्ह्याच्या स्वरूपावरून आणि न्यायालयाने किती रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला त्यानुसार संबंधित गुन्हेगार अथवा त्याच्या नातेवाईकांकडून आरोपी पैसे उकळत. त्यानंतर मुश्ताक लगेच रोशनबीला सांगून जामीन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यक्तींना त्यांच्या छायाचित्रासह तहसील कार्यालयात येण्यास सांगत असे. सेतू कार्यालयातून सातबारा काढत. सातबाऱ्यावरील ज्या मालमत्ताधारकाचे नाव आहे त्या नावाचे आणि बनावट जामीनदाराचे छायाचित्र असलेले बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड तयार करण्याचे काम पूनम दिगंबर सावजी ऊर्फ गणोरकर आणि लालचंद अग्रवाल यांच्याकडे होते. 

सातबाराच्या आधारे बनावट व्यक्तीचे छायाचित्र अर्जावर लावून तहसील कार्यालयातून ऐपत प्रमाणपत्र तयार करून घेत. हे ऐपत प्रमाणपत्र आणि बनावट आधारकार्डसह रॅकेटमधील एखाद्या व्यक्तीला न्यायालयात जामीनदार म्हणून उभे करीत आणि गुन्हेगारांचा जामीन घेत. एवढेच नव्हे, तर या रॅकेटने औरंगाबादसह पुणे, नाशिक आणि मुंबईतही गुन्हेगारांचा जामीन घेऊन त्यांना कारागृहाबाहेर काढले. 

ऐपत प्रमाणपत्रावर खाडाखोड करून जामीन
ऐपत प्रमाणपत्र तयार केल्यानंतर एक महिन्याच्या आत त्यावर जामीन घेता येतो, ही बाब रॅकेटला माहीत असल्याने ऐपत प्रमाणपत्राच्या तारखेत खाडाखोड करून गुन्हेगारांचा जामीन घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले. 

Web Title: Five racketeers of fake bailiffs racket; Planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.