ट्रान्सपोर्टच्या वाहनातून पाच लाखांचा माल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 20:11 IST2020-01-18T20:04:18+5:302020-01-18T20:11:59+5:30
यवतमाळातील प्रकार : भिवंडी मुंबई येथून आले होते वाहन

ट्रान्सपोर्टच्या वाहनातून पाच लाखांचा माल लंपास
यवतमाळ - ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपनीचा माल घेऊन यवतमाळात आलेल्या टेम्पोतून पाच लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहर ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
सिद्धेश्वर रोड लाईन्स पुणे या ट्रान्सपोर्ट कंपनीचा टेम्पो (एम.एच.१४/जीडी-३०८२) हा भिवंडी मुंबई येथून फ्लिपकार्ट कंपनीच्या २५१ बॅग घेऊन वाशिम-यवतमाळ-चंद्रपूर मार्गे गडचिरोली जाण्यासाठी निघाला. ४ नोव्हेंबर २०१९ रोजी हे वाहन यवतमाळातील मनोज बेकरीसमोर आले असता चालकाला टेम्पोचे सील तुटलेले दिसले. चोरीचा संशय आल्याने त्याने बॅगांची पडताळणी केली. तेव्हा वाहनातून २५१ पैकी २३ बॅगा चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले व पाच बॅग फाटलेल्या अवस्थेत दिसल्या. या २३ बॅगमध्ये पाच लाख ६० हजार ५४ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. याप्रकरणी टेम्पोचालक मोहम्मद शकूर वल्द अब्दुल रजाक इनामदार उर्फ शकी (रा.जुन्नर जि.पुणे) याच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.