स्कुटीच्या डिक्कीतून पाच लाख चोरले, आरोपी २४ तासाच्या आत ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 21:40 IST2026-02-10T21:40:35+5:302026-02-10T21:40:57+5:30
परभणीतील वसमत रोड भागातील घटना : स्थागुशा, मोंढा पोलिसांची कारवाई

स्कुटीच्या डिक्कीतून पाच लाख चोरले, आरोपी २४ तासाच्या आत ताब्यात
परभणी : शहरातील वसमत रोड परिसरात वसंतराव नाईक यांच्या पुतळा परिसरात एका हॉटेल समोर लावलेल्या स्कुटी वाहनातील डिक्कीत ठेवलेली पाच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यानेचोरून नेली. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर आरोपीस २४ तासाच्या आत चोरलेल्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हा शाखा आणि नवा मोंढा पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले.
याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात मंगळवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यात आला. व्यापारी आकाश प्रकाशराव ढाकणे यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या स्कुटी क्रमांक (एमएच २२ एझेड ००८०) यामध्ये डिक्कीत पाच लाख रुपये रोकड त्यांनी ठेवली होती. सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे वसंतराव नाईक पुतळा परिसरातील विठ्ठल हॉटेल समोर आले होते. त्यांनी तेथे त्यांची दुचाकी लावली. यामध्ये स्कुटीच्या डिक्कीत पाचशे रुपयांच्या एक हजार नोटा असलेले पाच लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. तपास पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर करीत आहेत. जीवारथीनम डेव्हिड बाबू (३३, रा. राजमनगाम, विल्लीवक्कम, जि. चेन्नई) यास सापळा रचून परभणी शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे मुद्देमालाची विचारणा करून पैसेही जप्त करण्यात आले.
यांनी केली कामगिरी
ही कामगिरी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ, सहाय्यक पोलिस अधीक्षक जीवन बेनिवाल यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक विवेकानंद पाटील, महादेव मांजरमकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, गणेश कौटकर, अनिल कटारे, अर्जुन टाक, रामेश्वर मुंडे, नागरगोजे यांनी केली.