जमिनीच्या वादातून नागलगाव येथे गोळीबार; एकजण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 20:43 IST2021-08-01T20:42:47+5:302021-08-01T20:43:47+5:30
Firing Case : उदगीर तालुक्यातील नागलगावची घटना

जमिनीच्या वादातून नागलगाव येथे गोळीबार; एकजण गंभीर
उदगीर (जि. लातूर) : जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना तालुक्यातील नागलगाव शिवारात रविवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास घडली. यात एकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे.
उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन यांनी सांगितले, तालुक्यातील नागलगाव येथील शिवाजी ज्ञानोबा पाटील आणि रमेश गणपती गुडसुरे हे शेतशेजारी आहेत. त्यांच्यात काही दिवसांपासून जमिनीचा वाद सुरु आहे. रविवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास शिवाजी पाटील याने जमिनीच्या वादातून रमेश गणपती गुडसुरे (३५) व त्यांचा भाऊ सतीश गणपती गुडसुरे यांच्यावर स्वतःजवळील रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली. यात रमेश गुडसुरे यांना गोळी लागली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले आहे. यातील आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावात शांततेचे वातावरण आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.