Finally expose sin! rapes four women from same family by fake baba | अखेर पाप उघड! भोंदू मांत्रिकाचा एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

अखेर पाप उघड! भोंदू मांत्रिकाचा एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

ठळक मुद्देही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (वय ५०) या मांत्रिकाला अटक केली.

नागपूर - भूतबाधेची भीती दाखवून उपचाराच्या नावाखाली एका भोंदू मांत्रिकाने अल्पवयीन मुलगी, तिची आई, मामी आणि आजी अशा चाैघींवर सात महिन्यात अनेकदा बलात्कार केला. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी धर्मेंद्र विठोबा निनावे उर्फ दुलेवाले बाबा (वय ५०) या मांत्रिकाला अटक केली.


आरोपी निनावे पारडीत राहतो. त्याच भागात पीडित परिवार राहतो. पीडित मुलगी १७ वर्षांची असून ती अकरावीत शिकते. तिच्या वडिलांची आरोपी निनावेसोबत २०१८ पासून मैत्री होती. त्यामुळे तो या कुटुंबातील सदस्यांना कधीबधी अंगारे, धुपारे करायचा. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याच्या काळात (मे २०२०) पीडित मुलीची प्रकृती वारंवार बिघडू लागली. खासगी दवाखाने बंद असल्याने मेडिकल स्टोर्समधून गोळी घेऊन तिचे कुटुंबीय तिला देत होते. मात्र, काही दिवस झाले की तिची पुन्हा प्रकृती बिघडत होती. त्यामुळे खासगी काम करणारे मुलीचे वडील अस्वस्थ होते. दरम्यान, आरोपीने एक दिवस त्यांना काय प्रॉब्लेम आहे, अशी विचारणा केली. त्याने मुलीची प्रकृती वारंवार बिघडते, असे सांगताच मांत्रिक निनावेने तिला आपल्या दरबारात आणायला सांगितले. त्यामुळे मुलीचे आईवडील तिला निनावेच्या घरी घेऊन गेले. त्याने अंगात आल्याचा बनाव करून मुलीला भयंकर भूतबाधा झाल्याचे सांगितले. मोठी पूजा करावी लागेल, असे सांगून त्याने आपले जाळे टाकले. त्यानंतर अंगारे धुपारे, गुंगीची आैषध देऊन, रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी नेऊन तो ‘विधीच्या नावाखाली’ मुलीवर बलात्कार करू लागला. तुझ्या अंगातील भूत पळवायचे आहे त्यामुळे तू कुणाला या विधीबद्दल सांगितले तर तुझ्या कुटुंबातील सर्व जणांना भूत ठार मारेल, असे सांगून त्याने मुलीला गप्प केले. हे करतानाच त्याने एक दिवस मुलीच्या आईवरही बलात्कार केला. तिलाही ठार होण्याची भीती दाखवून गप्प केले. कधी आरोपी स्वताच्या घरी, कधी पिडितेच्या घरी तर कधी बाहेर नेऊन कुकृत्य करायचा. एक दिवस त्याने पूजेच्या नावाखालीच बाजुलाच राहणाऱ्या मुलीच्या मामीच्या घरी जाऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर मुलीच्या ६० वर्षीय आजीसोबतही त्याने तोंड काळे केले.


अखेर पाप उजेडात आले

डिसेंबर अखेरपर्यंत त्याचे हे कुकर्म सुरू होते. चाैघीही लज्जेखातर एकमेकींना हा प्रकार सांगत नव्हत्या. मात्र, एक दिवस तो बलात्कार करताना दुसरीला दिसला. ते बघून त्याने आपल्यासोबतही असेच केल्याचे पीडितेला सांगितले. नंतर मामी अन् आजीसोबत चर्चा झाली असता त्याने आपल्यावरही अत्याचार केल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या संतापाचा भडका उडला. कुटुंबातील पुरुषांसोबत चर्चा करून पीडितांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, गेल्या आठवड्यात पीडित परिवाराने पारडी ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपीला अटक करून त्याची पोलीस कोठडी मिळवली. सोमवारी त्याची कोठडी संपणार असून, पुन्हा पोलीस ती वाढवून घेणार आहेत. विशेष म्हणजे, आरोपीला अटक करून आठ दिवस होऊनही पारडी पोलिसांनी या संतापजनक प्रकरणाचे वृत्त बाहेर कळणार नाही, याची पुरेपुर काळजी घेतली.


बाहेरगावीही नेऊन केला अत्याचार
नराधम निनावेने पीडित मायलेकीला डोंगरगड आणि चंद्रपुरात पूजेसाठी नेले. तेथे खोली घेऊन त्याने दोघींवरही अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्याने आपल्या घरातच दरबार थाटल्याचे दिसून आले. देव अंगात येतो असे सांगून तो मांत्रिकाची वेषभूषा करतो आणि पीडितांना गंडे दोरे देऊन त्यांच्याकडून रक्कम उकळतो, असेही स्पष्ट झाले आहे. त्याने अशाच प्रकारे अन्य महिला-मुलींवर बलात्कार केला असावा, असा संशय आहे.

Web Title: Finally expose sin! rapes four women from same family by fake baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.