दिल्लीतील काश्मिरी गेट परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका चिमुकलीला किडनॅप करण्यात आलं. पत्नीच्या निधनानंतर पित्याने आपल्या ३ वर्षांच्या मुलीला दिवसरात्र स्वतःसोबत घर आणि दुकानात ठेवलं होतं. मात्र किडनॅप करणाऱ्या टोळीची नजर या मुलीवर पडली आणि दुकानाबाहेरून तिला किडनॅप करण्यात आलं. मुलीला नेपाळला पाठवण्याच्या किंवा मूल नसलेल्या जोडप्याला विकण्याच्या तयारीत असलेल्या किडनॅपर कुटुंबाला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत.
डीसीपी राजा बांठिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी रोजी मुजफ्फर अली नावाचा एक व्यक्ती अत्यंत हतबल अवस्थेत काश्मिरी गेट पोलीस ठाण्यात आला. त्याने सांगितलं की, तो सुंदर नगरी येथे राहतो आणि त्याची ३ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे. काही काळापूर्वी त्याच्या पत्नीचे निधन झालं असल्याने तो आपल्या मुलीला एकटं सोडत नसे. काश्मिरी गेट येथील मिनर्वा सिनेमा रोडवरील आपल्या दुकानावर तो तिला रोज सोबत आणत असे. १२ जानेवारीला संध्याकाळी ६:३० च्या सुमारास दुकानाबाहेरून ती अचानक गायब झाली.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाला सुगावा
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि अनेक पथकं तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, एक ६-७ वर्षांची मुलगी त्या ३ वर्षांच्या चिमुरडीला फूस लावून जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकाच्या दिशेने घेऊन जाताना दिसली. रेल्वे स्थानकावरील फुटेजमध्ये ती मुलगी चिमुरडीला आधीच वाट पाहत असलेल्या आपल्या कुटुंबाकडे सोपवताना दिसली. त्यानंतर हे किडनॅपर कुटुंब गर्दीत गायब झालं.
१०० पोलीस आणि ४०० CCTV कॅमेऱ्यांची नजर
मुलीचा शोध घेण्यासाठी उत्तर जिल्ह्याच्या सुमारे १०० पोलिसांची पथकं तयार करण्यात आली. जुन्या दिल्ली रेल्वे स्थानकासह शाहदरा आणि साहिबाबाद यांसारख्या रेल्वे स्थानकांचे प्लॅटफॉर्म, वेटिंग हॉल आणि रेल्वे ट्रॅकचा कोपरा न कोपरा तपासण्यात आला. या दरम्यान तब्बल ४०० सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यात आले.
अखेर यश मिळालं
तपासादरम्यान एका सीसीटीव्हीमध्ये किडनॅपर कुटुंब जुन्या लोखंडी पुलाच्या दिशेने ई-रिक्षाने जाताना दिसले. पोलिसांनी सलग १२ किलोमीटरच्या परिसरातील त्यांच्या हालचालींचा माग काढला. अखेर १७ जानेवारी रोजी यमुना बाजार येथील हनुमान मंदिराजवळून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. ही मुलगी भीक मागणाऱ्या एका कुटुंबाकडे सापडली. जेव्हा पोलिसांनी मुलीला पित्याच्या स्वाधीन केलं, तेव्हा आपल्या काळजाच्या तुकड्याला सुखरूप पाहून वडिलांना रडू कोसळलं. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यामागे मोठी मानवी तस्करीची टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Web Summary : A 3-year-old girl was kidnapped from Delhi. Police used 100 officers and 400 CCTV cameras to find her. The girl was located near a temple and rescued. The father wept upon being reunited with his daughter.
Web Summary : दिल्ली से 3 साल की एक बच्ची का अपहरण कर लिया गया था। पुलिस ने उसे ढूंढने के लिए 100 अधिकारियों और 400 सीसीटीवी कैमरों का इस्तेमाल किया। लड़की एक मंदिर के पास मिली और उसे बचाया गया। अपनी बेटी से दोबारा मिलकर पिता रो पड़े।