खोटा अपघात, मृत्यू, तेरावं.. २ कोटींसाठी जिवंत मुलाला दाखवलं मृत, 'असा' झाला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:53 IST2025-03-30T13:53:29+5:302025-03-30T13:53:35+5:30
विम्याची रक्कम दुप्पट मिळविण्यासाठी खोटा अपघात घडवून आणण्यात आला आणि खोटं डेथ सर्टिफिकेकट करण्यात आलं.

खोटा अपघात, मृत्यू, तेरावं.. २ कोटींसाठी जिवंत मुलाला दाखवलं मृत, 'असा' झाला पर्दाफाश
कर्जातून मुक्त होण्यासाठी लोक फसवणुकीचा मार्ग अवलंबतात अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. दिल्ली ग्रामीणमधील नजफगड भागातून असाच एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विम्याची मोठी रक्कम मिळविण्यासाठी १ कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला. विम्याची रक्कम दुप्पट मिळविण्यासाठी खोटा अपघात घडवून आणण्यात आला आणि खोटं डेथ सर्टिफिकेकट करण्यात आलं, खोटे अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच गावात तेरावं देखील करण्यात आलं.
जेव्हा हे प्रकरण पोलिसांकडे गेलं आणि ते आरोपींना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा सत्य बाहेर आलं. या प्रकरणात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे, आता आरोपी जामिनासाठी न्यायालयात चकरा मारत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ५ मार्च रोजी रात्री उशीरा नजफगडमधील फिरनी रोडवर झालेल्या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली, ज्यामध्ये दोन बाईकची धडक झाल्याची नोंद आहे. सुरुवातीला त्यात एक व्यक्ती जखमी झाली होती.
मुलाला मृत घोषित करण्यात आलं. त्याचे वडील आणि इतर लोक गढ गंगा येथे गेले आणि अंत्यसंस्कार केले. त्यानंतर तेरावं देखील करण्यात आलं. यामुळे लोकांना मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचं समजलं. पण जेव्हा विम्याचा दावा करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा पोलीस कागदपत्रं आवश्यक होती. त्यानंतर तरुणाचा वकील असल्याचं भासवून एक माणूस आणि आरोपी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी अपघात कसा झाला हे सांगितलं.
अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे आणि त्याचे तेराव्याचे विधी पूर्ण झाले आहेत.पोलिसांना हा सर्व प्रकार संशयास्पद वाटला. त्यांना काहीतरी भलतंच घडल्याचं वाटत होतं. अनेक दिवसांच्या चौकशीनंतर संपूर्ण कट उघडकीस आला आणि नजफगड पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला आहे.