सुपे - चौफुला रस्त्यावर ट्रकच्या धडकेत अपघातात बापलेक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 15:59 IST2018-10-22T15:57:33+5:302018-10-22T15:59:55+5:30
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील कंपनीत मुलाखत देण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या बापलेकाला समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली.

सुपे - चौफुला रस्त्यावर ट्रकच्या धडकेत अपघातात बापलेक ठार
सुपे: दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील कंपनीत मुलाखत देण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या बापलेकाला समोरून आलेल्या ट्रकने धडक दिली.या अपघातात दोघे जागीच ठार झाल्याची घटना सुपे - चौफुला रस्त्यावरील पडवी हद्दीतील पानमळा येथे सोमवारी ( दि. २२) सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. तर या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे.
रामचंद्र तुकाराम लव्हे ( वय ५५ ), अमोल रामचंद्र लव्हे (वय २५ रा. बाबुर्डी, लव्हे गोठा, ता. बारामती) या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लव्हे हे सुप्याकडुन चौफुल्याकडे लुना ( एम एच ४२ ए सी ३६४१ ) वरुन निघाले होते. तर चौफुल्याच्याबाजुने मालवाहतूक ट्रक ( क्र. एम एच १४ व्ही ५३९६ ) सुप्याकडे येत होता. या दरम्यान पानमळा येथील बसस्टॉपनजीक समोरुन आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघे डांबरीरस्त्यावर पडले. यावेळी त्या दोघांच्या डोक्याला जबर मार लागुन रक्तस्त्राव झाल्याने बापलेकाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. हे दोघे लुनावर कुरकुंभ येथील सिप्ला कंपनीत मुलाच्या मुलाखतीसाठी निघाले होते.मात्र, वाटेवर या बापलेकांवर काळाने घाला घातला.
यासंदभार्तील फिर्याद राजकुमार किसन लव्हे (वय ३५ रा. बाबुर्डी ) यांनी यवत पोलिसांना दिल्याचे पोलिस कॉंस्टेबल ए. एम. गायकवाड यांनी दिली. या अपघातातील मालवाहतुक ट्रक चालक आप्पा नामदेव गायकवाड (रा. यवत ) फरार झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. एन. देवकर करीत आहेत.