कुटुंबाचा लग्नाला विरोध, आंतरजातीय विवाह करणाऱ्या पती-पत्नीचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 09:29 IST2021-10-19T09:28:05+5:302021-10-19T09:29:16+5:30
Crime News: प्रेम संबंधातून आंतरजातीय विवाह झालेल्या पती-पत्नीने विष प्रशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

कुटुंबाचा लग्नाला विरोध, आंतरजातीय विवाह करणाऱ्या पती-पत्नीचा विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
भंडारा - प्रेम संबंधातून आंतरजातीय विवाह झालेल्या पती-पत्नीने विष प्रशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना लाखांदूर येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मुलाच्या कुटुंबाचा विवाहाला विरोध केल्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. दोघांवर चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
अश्विनी अमित मिसार (२७) व अमित नीलकंठ मिसार (३०) रा. लाखांदूर असे विष प्राशन करणाऱ्या पति-पत्नीचे नाव आहे. अमित व अश्विनीने पाच वर्षापूर्वी प्रेम संबंधातून आंतरजातीय विवाह केला. विवाहानंतर दोघेही नागपूर येथे राहत होते. या विवाहाची आश्विनीच्या कुटुंबियांना माहिती असली तरी अमितच्या कुटुंबियांना माहिती नसल्याचे सांगण्यात आले. गत दोन वर्षापासून कोरोना संकट उद्भवल्याने दोघेही स्वगावी परतले. यावेळी कुटुंबियांना विवाहाची माहिती होऊ नये यासाठी दोघांनीही आपापल्या आई वडिलांकडे काहीकाळ विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. तसे वास्तव्य सुरु केले.
प्रेमविवाह होवून कायदेशीर विवाह नोंदणी झाली नसल्याने अमितच्या कुटुंबियांची मर्जी संपादनासाठी दोघांनीही पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. त्यानुसार गत दोन तीन दिवसांपूर्वी दोघांनीही पुनर्विवाह करुन अमितच्या घरी आले. यावेळी घरच्यांनी या विवाहाला कडाडून विरोध केला. दोघांनाही घराबाहेर काढले. या प्रकाराने वैतागलेल्या दोन्ही सोमवार १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी मृत्यूपर्व चिठ्ठीत आत्महत्येसाठी जबाबदार व्यक्तींची नावे लिहून मित्रांच्या एका व्हॉटस अँप ग्रुपवर टाकले. यावरुन मित्रांनी दोघांचा शोध घेत उपचारासाठी दवाखान्यात भरती केले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.