डोळ्यात ‘स्प्रे’ मारून चोरी केल्याचा बनाव उघड, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 00:42 IST2025-07-06T00:42:20+5:302025-07-06T00:42:49+5:30

उमदी पोलिसांकडून पर्दाफाश, पावणे तेरा लाख रोकड जप्त

Eye spray theft case exposed, three arrested | डोळ्यात ‘स्प्रे’ मारून चोरी केल्याचा बनाव उघड, तिघांना अटक

डोळ्यात ‘स्प्रे’ मारून चोरी केल्याचा बनाव उघड, तिघांना अटक

सांगली/ उमदी : उमदी (ता. जत) जवळ डोळ्यात ‘स्प्रे’ मारून पावणे तेरा लाख रूपये लुटल्याचा बनाव करणाऱ्या टोळीचा उमदी पोलिसांनी १६ तासात पर्दाफाश केला. प्रमोद सुभाष शिंदे (वय ३२, रा. चौगुले वस्ती, खडकी, ता. मंगळवेढा), सिद्धेश्वर अशोक डांगे (वय २७, रा. खडतरे गल्ली, सांगोला), तौफीक समशेर मणेरी (वय ३५, रा. मणेरी मळा, सांगोला) या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून १२ लाख ७६ हजार रोकड जप्त केली. आणखी एक संशयित अक्षय इंगोले (रा. सांगोला) हा पसार आहे.

मंगळवेढा परिसरातील व्यापारी फारूख शेख यांनी जांभूळ खरेदीसाठी प्रमोद शिंदे याला पावणे तेरा लाखाची रोकड देऊन दि. २ रोजी आंध्रप्रदेशला पाठवले होते. शिंदे याला एवढी मोठी रोकड पाहून हाव सुटली. त्याने मित्र सिद्धेश्वर डांगे ऊर्फ दादा दांडगे, तौफीक मणेरी, अक्षय इंगोले यांना एकत्र करून चोरीचा बनाव करण्याचे ठरवले. त्यानंतर ही रक्कम आपापसात वाटून घेण्याचे कारस्थान रचले.
कारस्थानानुसार मंगळवेढा ते ताडपत्री (आंध्रप्रदेश) या मार्गावर उमदीपासून पुढे आरटीओ चेकपोस्टजवळ रात्री पावणे दहाच्या सुमारास प्रमोद शिंदे याला उलटी आल्याचे भासवले. गाडी थांबवल्यानंतर मोटारीतून आलेल्या तिघापैकी एकाने फिर्यादी अभिजीत वाडकर याच्या डोळ्यावर स्प्रे मारला. तर इतर दोघांनी प्रमोद शिंदे याला मारहाण केली. त्यानंतर गाडीत असलेल्या सॅकमधील १२ लाख ७६ हजार ८०० रूपये रोकड लंपास केली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या वाडकर याने उमदी पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. वाडकर याचा कारस्थानात सहभाग नव्हता. पोलिसांनी शिंदे याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याच्या बोलण्यात थोडी विसंगती जाणवली. त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने त्याचे साथीदार सिद्धेश्वर डांगे, ताैफीक मणेरी या दोघांना देखील अटक केली. तर चौथा साथीदार अक्षय इंगोले हा पसार आहे.
उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे, उपनिरीक्षक बंडू साळवे, कर्मचारी संतोष माने, आगतराव मासाळ, सोमनाथ पोटभरे, महादेव मडसनाळ यांच्या पथकाने हा बनाव उघडकीस आणला.

१६ तासात छडा
प्रमोद शिंदे याने त्याचा मित्र अभिजीत वाडकर याला अंधारात ठेवून जबरी चोरी करून डल्ला मारण्याचा कट रचला होता. पावणे तेरा लाखाची चौघेजण वाटणी करणार होते. परंतू पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करून त्यांचे कारस्थान उधळून लावले.

Web Title: Eye spray theft case exposed, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.