Exposed gang selling newborn babies | नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेघींना अटक

नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेघींना अटक

मुंबई : मूल न होणाऱ्या दाम्पत्याला नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश करून ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यात, स्वतःच्या मुलांना विकणाऱ्या दाेन महिलांचाही समावेश आहे. यात आतापर्यंत विकलेल्या सात बालकांची आणि त्यांच्या पालकांची माहिती मिळविण्यास पोलिसांना यश आले.

गुन्हे शाखेच्या कक्ष १ चे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी ही कारवाई केली. वांद्रे परिसरात ज्ञानेश्वरनगर येथील लहान बालकांच्या विक्रीबाबत माहिती मिळताच तपासाअंती पथकाने स्वतःच्याच मुलांची विक्री करणाऱ्या दाेन महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून रूपाली वर्मा, गुलशन खान, आरती सिंह, गीतांजली गायकवाड, निशा अहिरे, डॉ. धनंजय गोगा या आरोपींना अटक केली.

याच आरोपींच्या चौकशीतून मुंबईसह पुणे तसेच अन्य ठिकाणी विक्री झालेल्या ७ बालकांची माहिती समोर आली. गेल्या ७ वर्षांत अनेक बालकांची विक्री केल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवजात बालकांची विक्री करणाऱ्या या टोळीमध्ये डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन यांचाही समावेश आहे. या प्रकरणी आणखी किती जणांचा समावेश आहे, हे जाळे मुंबई, पुण्यासह आणखी कुठपर्यंत विस्तारलेले आहे, अन्य काेणी म्हाेरक्या आहे का?, या अन्य बाबींचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.  

अडीच ते साडेतीन लाखांना विक्री -
अडीच ते साडेतीन लाख रुपयांना बालकांची विक्री केल्याचे चौकशीत समोर आले आहे. यात बालकांच्या पालकांना ७० हजार ते दीड लाख रुपये मिळाले. उर्वरित रक्कम सहा आरोपींना दलाली म्हणून मिळाल्याची माहिती समोर आली आहेे.

Web Title: Exposed gang selling newborn babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.