भांडणाला वैतागून मुलाने वयोवृद्ध आईची गळा दाबून केली हत्या; पुरावे लपवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 21:21 IST2021-05-02T21:21:17+5:302021-05-02T21:21:58+5:30
Mother was strangled to death : ही घटना राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील सूरजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुवीरपुरा येथे शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता.

भांडणाला वैतागून मुलाने वयोवृद्ध आईची गळा दाबून केली हत्या; पुरावे लपवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल
राजस्थानमधील झुंझुनूं येथे आई आणि पत्नीच्या दररोजच्या भांडणाला कंटाळलेल्या एका व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याने आपल्या जन्मदात्या ७५ वर्षीय आईची गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे आरोपी मुलाने पुरावे नष्ट करण्यासाठी आईच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तिला जाळूनही टाकलं. मात्र, त्याने केलेला गुन्हा लपवू शकला नाही. केवळ २४ तासांत पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ही घटना राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील सूरजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रघुवीरपुरा येथे शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याबाबतची माहिती आरोपी मुलगा अशोक कुमार याने स्वतः पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. या हत्येप्रकरणात पोलिसांना सुरुवातीपासून मुलगा अशोक कुमारवर संशय होता. यानंतर पोलिसांनी अशोक कुमार याला ताब्यात घेतलं. तेव्हा सुरुवातीला अशोकने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, शेवटी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
७५ वर्षीय मृत महिलेचं नाव शरबती देवी असून त्यांना तीन मुलं आहेत. त्या सध्या आपल्या मधल्या म्हणजेच दुसऱ्या नंबरचा मुलगा अशोक कुमारसोबत गावीच राहत होत्या. मात्र, अशोक कुमारची पत्नी आणि त्यांच्यात नेहमी खटके उडत. किरकोळ कारणावरून दररोज होणाऱ्या वादातून आरोपी मुलाने आपल्या आईची गळा दाबून हत्या केली आहे. त्यानंतर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळला. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या २४ तासात हत्येचा छडा लावून आरोपी मुलाला अटक केली आहे, अशी माहिती दैनिक भास्करने दिली आहे.