कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:03 IST2025-12-26T14:01:59+5:302025-12-26T14:03:05+5:30
उदयपूरमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली आहे.

फोटो - आजतक
उदयपूरमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली आहे. "सकाळी जेव्हा थोडी शुद्ध आली, तेव्हा सर्वात आधी माझं लक्ष कपड्यांकडे गेलं. कानातले नव्हते, मोजे आणि अंडरगारमेंटही गायब होते. प्रायव्हेट पार्टवर जखमांच्या खुणा होत्या" असं महिलेने सांगितलं आहे. उदयपूरमधील एका आयटी कंपनीत मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या पीडितेच्या तक्रारीवरून कंपनीचा सीईओ, एक महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिचा पती या तिघांना चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
२० डिसेंबर रोजी शोभागपुरा येथील एका हॉटेलमध्ये कंपनीच्या सीईओचा वाढदिवस आणि नवीन वर्षाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. पीडिता रात्री ९ वाजेच्या सुमारास पार्टीत पोहोचली. हा कार्यक्रम उशिरापर्यंत चालला आणि रात्री १:३० च्या सुमारास संपला. याच दरम्यान पीडितेची तब्येत बिघडली आणि तिला घरी जायचं होतं. काही लोक तिला घरी सोडण्याच्या तयारीत असतानाच, कंपनीच्या महिला एक्झिक्युटिव्ह हेडने ‘आफ्टर पार्टी’चा प्रस्ताव ठेवला.
विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण...
यानंतर पीडितेला कारमध्ये बसवण्यात आलं. कारमध्ये आधीच महिला एक्झिक्युटिव्ह हेडचा पती आणि कंपनीचा सीईओ उपस्थित होते. तिला घरी सोडलं जाईल असं सांगण्यात आलं. काही वेळातच तिची प्रकृती खालावली आणि ती बेशुद्ध झाली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर काय घडले हे तिला स्पष्टपणे आठवत नाही. जेव्हा तिला थोडी शुद्ध आली, तेव्हा कोणीतरी छेडछाड करत असल्याचं जाणवलं. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण नराधमांनी तिचे काहीही ऐकले नाही.
कारमध्ये केला सामूहिक बलात्कार
असा आरोप आहे की, रात्री १:४५ ते पहाटे ५ या दरम्यान कारमधील तिन्ही आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास तिला तिच्या घराच्या जवळ सोडून आरोपी पसार झाले. ती कशीबशी घरी पोहोचली आणि शुद्धीवर आल्यावर तिला शरीरावरील जखमा, वेदना आणि तिचे कपडे व दागिने गायब असल्याचं समजलं.
डॅशकॅममध्ये सर्वकाही कैद
पीडितेने या घटनेचे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. तिला आठवलं की ज्या कारमध्ये तिला नेण्यात आलं होतं, त्यात 'डॅशकॅम' बसवलेला होता. तिने डॅशकॅमचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग तपासले असता, त्यात झालेलं बोलणं आणि ओरडण्याचे आवाज ऐकू आले. या रेकॉर्डिंगमुळे तिच्या संशयाला पुष्टी मिळाली आणि हाच पुरावा तपासात अत्यंत महत्त्वाचा ठरला.
३ जणांना अटक
उदयपूर पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास चक्र फिरवली. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी माधुरी वर्मा यांनी तपास सुरू केला. पीडितेचा जबाब, वैद्यकीय अहवाल आणि काही पुराव्यांच्या आधारे सामूहिक बलात्काराची पुष्टी झाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आयटी कंपनीचा सीईओ जयेश, सह-आरोपी गौरव आणि त्याची पत्नी यांना अटक केली आहे.