२५ कोटींचे अमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:51 AM2021-09-22T11:51:03+5:302021-09-22T11:51:12+5:30

त्यांच्याकडून एकूण ५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याचे बाजारमूल्य २५ कोटी रुपये इतके आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिला आणि तिच्या ३३ वर्षीय मुलीला अटक करण्यात आली आहे.

Drugs worth Rs 25 crore seized at Mumbai airport | २५ कोटींचे अमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त

२५ कोटींचे अमली पदार्थ मुंबई विमानतळावर जप्त

googlenewsNext

मुंबई : मुंबईविमानतळावर तब्बल २५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी दोन परदेशी महिलांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे सीमाशुल्क विभागाकडून मुंबई विमानतळावर विशेष दक्षता घेतली जात आहे. रविवारी मध्यरात्री जोहान्सबर्गहून आलेल्या दोन महिलांच्या संशयास्पद हालचाली हेरून अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. त्यांनी आपल्या बॅगमध्ये छुप्या पद्धतीने हेरॉईन लपवून आणल्याचे तपासणीत उघड झाले. त्यामुळे या महिलांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्याकडून एकूण ५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याचे बाजारमूल्य २५ कोटी रुपये इतके आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिला आणि तिच्या ३३ वर्षीय मुलीला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ वाहक म्हणून या महिलांचा वापर करण्यात आला होता. भारतात ५ किलो हेरॉईन पोहोचविण्याच्या मोबदल्यात त्यांना ३.७ लाख डॉलर देण्यात येणार होते. मुंबईत दाखल झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये हे अमली पदार्थ संबंधितांना सोपविले जाणार होते. या महिलांच्या मागावर तपास यंत्रणा नसल्याची खात्री केल्यानंतरच दलाल त्यांना भेटणार होते.

या महिला संबंधित दलालांना कोणत्या हॉटेलमध्ये भेटणार होत्या, त्यांना कोणाकडून संपर्क केला गेला याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अमली पदार्थ जप्त केले जात असून ते नेमके कुणासाठी आणि कशासाठी आणले जात आहेत याचा पोलीस सध्या शोध घेत आहे.
 

Web Title: Drugs worth Rs 25 crore seized at Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.