DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:16 IST2025-08-13T10:57:36+5:302025-08-13T11:16:28+5:30
जैसलमेरमधील चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळ असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या गेस्ट हाऊसमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने मंगळवारी अटक केली.

DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
जैसलमेरमधील चंदन फील्ड फायरिंग रेंजजवळ असलेल्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या गेस्ट हाऊसमध्ये काम करणाऱ्या मॅनेजरला राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने मंगळवारी अटक केली. या खळबळजनक प्रकरणात, आरोपीवर पाकिस्तानी गुप्तहेर संस्था ISIसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप आहे.
कोण आहे हा हेर?
महेंद्र प्रसाद हा मूळचा उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील पल्युन गावाचा आहे. DRDO गेस्ट हाऊसमध्ये मॅनेजर म्हणून काम करणारा हा व्यक्ती भारताची गोपनीय आणि सामरिक माहिती सीमेपार पाकिस्तानला पाठवत असल्याचा आरोप आहे. तो DRDO च्या गेस्ट हाऊसमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने आपली पाळत वाढवल्यानंतर त्याचा हा कारनामा उघडकीस आला.
१५ ऑगस्टपूर्वी अलर्ट वाढवला
स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमांपूर्वी राजस्थान सीआयडी इंटेलिजन्सने राष्ट्रविरोधी आणि विध्वंसक कृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तयारी केली होती. सीआयडीचे पोलीस महानिरीक्षक डॉ. विष्णुकांत यांनी सांगितलं की, संशयास्पद हालचालींची चौकशी करत असताना महेंद्र प्रसादची कृत्ये समोर आली. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेच्या संपर्कात असल्याचं उघड झालं.
मिसाईल चाचणी आणि लष्करी माहिती होती निशाण्यावर
महेंद्र प्रसाद कथितपणे DRDOच्या वैज्ञानिकांच्या आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या हालचालींची संवेदनशील माहिती आपल्या पाकिस्तानी म्होरक्यांना पाठवत होता. मिसाईल आणि शस्त्रास्त्रांची चाचणी होणाऱ्या चंदन फील्ड फायरिंग रेंजमध्ये ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर त्याची नजर होती. ही माहिती तो पाकिस्तानी हँडलर्सपर्यंत पोहोचवत होता, ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकला असता.
तांत्रिक तपासामुळे झालं सत्य उघड
जयपूरच्या सेंट्रल इंटररोगेशन सेंटरमध्ये विविध गुप्तचर संस्थांनी संयुक्तपणे महेंद्रची चौकशी केली. त्याच्या मोबाईल फोनच्या तांत्रिक तपासामुळे खळबळजनक खुलासा झाला. तो DRDO आणि भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानी एजंट्ससोबत शेअर करत असल्याचं निश्चित झालं. या पुराव्याच्या आधारे, १२ ऑगस्ट रोजी त्याच्या विरोधात ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, १९२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.