डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 08:49 IST2018-08-18T21:41:26+5:302018-08-19T08:49:02+5:30
सचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती एटीएसने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपणार असून या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले.

डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडणारा सापडला; ५ वर्षांनंतर एटीएसला मोठे यश
मुंबई - नालासोपाऱ्यात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शरद कळसकरच्या औरंगाबादेतील एका मित्राला कुंवारफल्लीतून ताब्यात घेतले होते. सचिन प्रकाशराव अंडुरे (वय 30)असे त्याचे नाव असून, तो कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिनला एटीएसने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे, अशी माहिती एटीएसचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. सचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या, अशी माहिती एटीएसने दिली आहे. त्यामुळे सचिनला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपण्यात येणार असून, या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले.
एटीएसने दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेतून सचिनला ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे त्याला नोटीस देऊन चौकशीसाठी नेत असल्याचे अधिकाऱ्यांनी त्याच्या नातेवाईकांना सांगितले. त्याच्यासोबत त्याचा भाऊही गेल्याचे सूत्रांकडून समजले. राज्यातील चार शहरांत बॉम्बस्फोट करण्याच्या उद्देशाने बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जमविणाऱ्या आरोपींचा गेल्या आठवड्यात एटीएसने पर्दाफाश केला होता. अटकेतील तीन जणांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरी येथील शरद कळसकर याचा समावेश आहे. कळसकरच्या चौकशीत त्याच्या जवळच्या मित्रांच्या यादीत सचिनचा समावेश असल्याचे एटीएसला समजले होतेे.
सचिनही हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचे त्याच्या फेसबुकवरील प्रोफाइल चित्रावरून दिसून आले. त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल, तर त्याला अटक केली जाईल; अन्यथा त्यास सोडून देऊ, असे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सूत्रांकडून समजतेे. त्यावेळी त्याच्या भावाने मीसुद्धा तुमच्या सोबत येतो, असे म्हणून तोदेखील अधिकाऱ्यांसोबत मुंबईला गेला. निराला बाजार येथील रेडिमेड कपड्याच्या दुकानात तो काम करतो. सचिनचे आई-वडील हयात नाहीत. तो पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह कुंवारफल्ली येथे राहतो. सचिन मे महिन्यात राजाबाजार, शहागंज परिसरात झालेल्या दंगलीच्या वेळी हिंदू वसाहतींतील घरांना संरक्षण देण्याची भाषा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिनला 3 महिन्यांची मुलगी असून औरंगाबाद येेेथे गेल्या 10 महिन्यापासून राहत होता.
नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्या पुलावरून जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक 25 ते 30 वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी दोघंही हल्लेखोर बाईकवर बसून परागंदा झाले.