'नात्याला कलंक लावू नका'; कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध, तरुणाने नात्यातील बहिणीसोबत आयुष्य संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 10:42 IST2025-10-20T10:34:04+5:302025-10-20T10:42:30+5:30
प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका जोडप्याने लातूरात आपली जीवनयात्रा संपवली.

'नात्याला कलंक लावू नका'; कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध, तरुणाने नात्यातील बहिणीसोबत आयुष्य संपवलं
Latur Crime: बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा तीव्र विरोध झाल्याने एका नर्स आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या एका दिव्यांग तरुणाने लातूर जिल्ह्यात एकत्र गळफास घेऊन आत्महत्या केली. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला पेठ गावच्या शिवारात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात आणि बीड जिल्ह्यातील दरडवाडी येथे शोककळा पसरली आहे. प्रेमाला विरोध होत असल्याने भावनिक कोंडीतून जीवनयात्रा संपवली.
नितीन संदीपान दराडे (वय २९) आणि राणी मालबा दराडे (वय २४) (दोघेही रा. दरडवाडी, ता. अंबाजोगाई, जि. बीड) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. नितीन हा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून, अहमदपूर येथे राहून एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता, तर राणी लातूर येथील एका खासगी रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत होती. भावकीतील असल्याने दोघांची ओळख प्रेमात बदलली, मात्र सुमारे ४ वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या या प्रेमप्रकरणाला दोन्ही कुटुंबीयांचा विरोध होता. 'नात्याला बदनाम करू नका,' असा सल्ला देऊन कुटुंबातील सदस्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकमेकांशिवाय जगणे शक्य नाही, या मानसिक दडपणाखाली आलेल्या या जोडप्याने टोकाचा निर्णय घेतला.
पत्र्याच्या शेडमध्ये गळफास
लातूरजवळ असलेल्या पेठ शिवारातील एका शेतातील पत्र्याच्या रिकाम्या खोलीत दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रविवारी सकाळी शेतमालक शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. शनिवारी नितीन हा लातुरात आला होता. दुपारनंतर दोघेही स्कुटीवरून लातुरात फिरले. त्यानंतर त्यांनी रात्री १० ते १०:१५ वाजण्याच्या सुमारास लातूरनजीक औसा महामार्गावरील पेठ गावच्या शिवारात शिंदे यांच्या गोठ्यात गेले. रात्री त्या दोघांनी दोरीने गळफास घेतला. रविवारी सकाळी ७ वाजता शेतमालक शिंदे हे शेतात आले. तेव्हा दोघांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवले.
नितीन आणि राणी यांनी शनिवारी सायंकाळीच आपले मोबाईल बंद केले होते. पोलिसांनी घटनास्थळी त्यांचे बंद मोबाईल सुरू करताच नातेवाईकांचे कॉल आले आणि त्यांना या दुर्दैवी घटनेची माहिती देण्यात आली.
नितीन अपंगत्वावर मात करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत होता, तर राणी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होती. तरीही, समाजातील दडपण आणि कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे रविवारी संपूर्ण गावात चूल पेटली नाही, कारण दोघांच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लातूर ग्रामीण पोलिसांत याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.