'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 15:36 IST2025-07-24T15:34:20+5:302025-07-24T15:36:02+5:30
बंगळुरूमध्ये एका तरुणाला पोलिसांनी अटक केले आहे. रस्त्यावर चालणाऱ्या महिलांचे व्हिडीओ शूट करून तो इन्स्टाग्रामवर शेअर करायचा.

'दिलबर जानी'चा कारनामा! १९ वर्षाचा तरुण महिला, तरुणींचे बनवायचा व्हिडीओ; 'बंगळुरू नाईट लाईफ'च्या नावाखाली...
शहरातील वेगवेगळ्या भागात फिरायचा. रस्त्यावरून चालणाऱ्या तरुणी, महिलांचे पाठीमागून व्हिडीओ शूट करायचा आणि नंतर हे व्हिडीओ बंगळुरू नाईट लाईफ म्हणून इन्स्टाग्रामवर पोस्ट करायचा. हे घाणेरडे कृत्य सुरू होतं फॉलोअर्स वाढवण्यासाठी. हे सगळं करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिलावर हुसैन एमडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने इन्स्टाग्रामवर दिलबर जानी-६७ नावाने एक अकाऊंट सुरू केले. तो बंगळुरूतील बायरथी भागात राहतो. तो मूळचा मणिपूरमधील आहे.
आरोपी काय काम करतो?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैन हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो बंगळुरूतील वेगवेगळ्या शहरात फिरून महिला आणि तरुणींचे व्हिडीओ शूट करत होता.
आरोपीला पोलिसांनी कसे पकडले?
बंगळुरूतील अशोक नगर पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियावर पाहणी करत असताना दिलबर जानी ६७ हे अकाऊंट दिसले. या अकाऊंटवर महिला, तरुणींचे त्यांच्या नकळत आक्षेपार्ह व्हिडीओ शूट करून पोस्ट केलेले दिसले. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर स्वतःहून गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी पूर्ण अकाऊंट बघितल्यानंतर त्यावर महिला आणि तरुणींचे पाठीमागून लपून व्हिडीओ शूट केलेले दिसले. महिला सार्वजनिक ठिकाणी चालत असताना हे व्हिडीओ बनवले गेले होते. बंगळुरुतील एमजी रोड, ब्रिज रोड, चर्च रोड, कोरामंगल आणि इंदिरानगर भागात त्याने हे व्हिडीओ शूट केले.
पोलीस उपनिरीक्षक नबी साब यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तरुणाला अटक केली. त्याने फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे व्हिडीओ शूट केल्याचे सांगितले. मागील तीन महिन्यापासून ते करत होता. पोलिसांनी इन्स्टाग्रामवरून हे अकाऊंट बंद करण्यासंदर्भात मेटाशी पत्रव्यवहार केला आहे.