७ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या गर्भवती पत्नीला संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी घरामागेच अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:47 IST2026-01-06T17:46:35+5:302026-01-06T17:47:14+5:30
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

७ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या गर्भवती पत्नीला संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी घरामागेच अंत्यसंस्कार
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इच्छापुरा गावात एका नवविवाहितेची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सासरच्या मंडळींनी केवळ तिचा जीवच घेतला नाही, तर पुरावे नष्ट करण्यासाठी माहेरच्या लोकांना कोणतीही माहिती न देता घरामागेच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला.
गुड़िया असं या महिलेचं नाव असून तिचं लग्न २८ मे २०२५ रोजी इच्छापुरा येथील पंकज ठाकूर याच्याशी झालं होतं. शनिवारी दुपारी गावात अचानक बातमी पसरली की सुनेचा मृत्यू झाला आहे. मात्र सासरच्यांनी माहेरच्या लोकांना न कळवता घाईघाईने अंत्यसंस्कार केले, तेव्हा संशय बळावला. गुड़ियाची मोठी बहीण पिंकी हिला याची कुणकुण लागताच तिने तातडीने आपल्या कुटुंबियांना माहिती दिली.
गुड़ियाचे माहेरचे लोक जेव्हा सासरी पोहोचले, तेव्हा तिथलं दृश्य पाहून सर्वांचा थरकाप उडाला. घराच्या मागे गोवऱ्यांच्या ढिगाऱ्यावर गुड़ियाचा मृतदेह जळत होता. संतप्त नातेवाईकांनी तात्काळ चितेवर पाणी ओतलं आणि आग विझवली. त्यानंतर पोलीस आणि एफएसएल (FSL) टीमने घटनास्थळी पोहोचून अर्धवट जळालेले अवशेष आणि पुरावे गोळा केले.
पोलिसांना घराच्या आत फरशीवर आणि भिंतींवर रक्ताचे डाग आढळले आहेत. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलं होतं, ज्यावरून गुड़ियाने स्वत:ला वाचण्यासाठी संघर्ष केल्याचं स्पष्ट होत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून कुऱ्हाड, फावडं आणि काठी जप्त केली आहे. यावरून गुड़ियाची हत्या अत्यंत क्रूरपणे केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गुड़िया ४ महिन्यांची गर्भवती होती.
गुड़ियाचे वडील देवेंद्र सिंह परमार यांनी सांगितलं की, लग्नात त्यांनी १५ लाख रुपये, बाईक आणि दागिने दिले होते. तरीही सासरचे लोक कार, सोन्याच्या चेनसाठी तिचा छळ करत होते. आरोपी पती पंकज हा पत्नीवर संशय घ्यायचा आणि तिला माहेरच्या लोकांशी बोलू द्यायचा नाही. आरोपी पतीला अटक केली आहे. घटनेनंतर सासरची इतर मंडळी घराला टाळं लावून फरार झाली आहेत. पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.