इक्बाल मिर्ची प्रकरणी तपासात सहकार्य न केल्याने डीएचएफएलच्या प्रमुखास ईडीने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 07:16 PM2020-01-27T19:16:19+5:302020-01-27T19:17:21+5:30

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे.

DHFL chief arrested by ED for not cooperating with Iqbal Mirchi PMLA case | इक्बाल मिर्ची प्रकरणी तपासात सहकार्य न केल्याने डीएचएफएलच्या प्रमुखास ईडीने केली अटक

इक्बाल मिर्ची प्रकरणी तपासात सहकार्य न केल्याने डीएचएफएलच्या प्रमुखास ईडीने केली अटक

googlenewsNext
ठळक मुद्दे तपासात सहकार्य न केल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) डीएचएफएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली आहे.  सनब्लिंक ही कंपनी वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांच्याशी संबंधित आहे.

मुंबई - मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची पीएमएलए प्रकरणी तपासात सहकार्य न केल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) डीएचएफएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली आहे.  

मृत गँगस्टर इक्बाल मिर्ची मनी लाँड्रिंग चौकशीप्रकरणी ईडीने दिवान हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना अटक केली आहे असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. ते पुढे म्हणाले की, वाधवान यांना चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला ईडीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालांना अटक केली होती. त्यानंतर, मिर्चीच्या मालमत्तेतील गैरव्यवहारांचा छडा लागला आहे. इक्बाल मिर्ची फरार असताना २०१३ मध्ये त्याचे लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६मध्ये मोहम्मद युसूफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडेसहा लाखांना विकत घेतल्या होत्या.त्याच्या मृत्यूनंतर त्या सुमारे २०० कोटींना विकण्यात आल्या. या व्यवहारामध्ये सनब्लिंकला रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हरुण युसूफ याने दलाली केली होती.

हे प्रकरण मिर्चीच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आहे. त्यापैकी तीन मालमत्ता सनब्लिंकला विकल्या गेल्या. सनब्लिंक ही कंपनी वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांच्याशी संबंधित आहे. ईडीने मिर्ची आणि  त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि इतरांविरूद्ध मुंबईतील महागड्या मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपासाठी गुन्हा दाखल केला आहे.
 

ईडीची कारवाई : इक्बाल मिर्चीची आणखी सहाशे कोटींची मालमत्ता जप्त

इक्बाल मिर्चीची सहाशे कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, लोणावळ्यातील फ्लॅट, बंगल्यांसह कार्यालय सील

मिर्चीविरोधात अमली पदार्थांच्या तस्करी आणि खंडणीचे गुन्हे आहेत. तसेच मिर्ची हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात असल्याचे म्हटले जाते. १९९३च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याच्या मालकीच्या मुंबईसह देशभरात मिळकती असून, हवालामार्फत त्यातून शेकडो कोटींचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मिर्चीच्या वरळी येथील सीजे हाउस तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील फ्लॅट, ताडदेव येथील अरुण चेंबर्स येथील कार्यालय, वरळीतील साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, क्रॉफर्ड मार्केट येथील तीन दुकान, गाळे आणि लोणावळा येथील बंगला व भूखंड जप्त केला आहे. या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे ६०० कोटी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: DHFL chief arrested by ED for not cooperating with Iqbal Mirchi PMLA case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.