"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:22 IST2026-01-05T16:20:40+5:302026-01-05T16:22:50+5:30
२ जानेवारी रोजी दिवसाढवळ्या भररस्त्यात गुंडगिरी पाहायला मिळाली.

"सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील"; बाप-लेकाला भररस्त्यात अमानुष मारहाण
दिल्लीच्या लक्ष्मी नगर परिसरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे, ज्याने राजधानीच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. २ जानेवारी रोजी दिवसाढवळ्या भररस्त्यात गुंडगिरी पाहायला मिळाली. आरोप आहे की, स्वतःला भाजपा-आरएसएसचा नेता म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या साथीदारांसह मिळून बाप-लेकाला निर्दयीपणे मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या संपूर्ण घटनेचा CCTV व्हिडीओ समोर आला असून, त्याने लोकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. पीडित तरुणाच्या पीसीआर (PCR) कॉलची ऑडिओ क्लिपही समोर आली असून, ज्यामध्ये तो पोलिसांकडे मदतीसाठी याचना करताना ऐकू येत आहे.
CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हे गुंड आधी तरुणाला त्याच्या घरातून जबरदस्तीने बाहेर ओढतात. त्यानंतर त्याला रस्त्यावर फरपटत नेलं जातं. पीडित तरुण ओरडत असतानाही आरोपी सतत त्याला मारहाण करत होते. ही संपूर्ण घटना एका निवासी भागात घडली, जिथे आसपास अनेक लोक उपस्थित होते. असे असूनही, कोणाही त्याला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही.
रस्त्यावर अमानुष मारहाण
CCTV मध्ये पुढे दिसते की, या गुंडांनी तरुणाला रस्त्यावर नग्न केलं आणि त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी लाथा-बुक्क्यांनी सतत हल्ला करत होते. आश्चर्याची बाब म्हणजे या काळात रस्त्यावर असलेले लोक केवळ प्रेक्षक बनून उभे राहिले. कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. व्हिडिओमध्ये तरुणाची हतबलता आणि आरोपींची गुंडगिरी स्पष्टपणे दिसून येते.
काही वेळानंतर दुचाकीवरून पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, पण परिस्थितीत लगेच कोणतीही कडक कारवाई दिसून आली नाही. सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळते की, पोलीस आल्यानंतरही आरोपी तिथेच उपस्थित होते आणि मोठ्या रुबाबात उभे होते. हे दृश्य दिल्लीपोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी त्याचे कपडे उचलून देतानाही दिसत आहे.
या प्रकरणात तरुणाने केलेल्या पीसीआर कॉलचा ऑडिओही समोर आला आहे. कॉलमध्ये तो मदतीची भीक मागत आहे. तो सांगत आहे की, त्याच्या वडिलांना निर्दयीपणे मारले जात आहे आणि तो एक तासापासून पोलिसांना फोन करत आहे, पण कोणतीही मदत मिळत नाहीय. "सर लवकर या, माझ्या वडिलांना हे मारून टाकतील" असं म्हणत आहे. हा ऑडिओ पोलिसांच्या प्रतिसाद वेळेवर आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
जिमच्या वादातून वैमनस्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित राजेश गर्ग यांच्या घरात एक जिम सुरू करण्यात आली होती. याच जिमवरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून आरोपींनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. मात्र, घटनेच्या वेळी पोलिसांच्या भूमिकेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणी विकास यादव, शुभम यादव, ओमकार यादव आणि पिंटू यादव यांच्यासह अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी सतीश यादव याला अटक केली आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारहाण करताना इतर अनेक लोकही दिसत आहेत, जे सध्या फरार आहेत. आरोपींच्या अटकेसाठी तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.