"मी तुझ्या बहिणीला मारतोय, किंकाळ्या ऐकून काळजाचं पाणी..."; स्वाट कमांडोचा 'तो' फोन कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:12 IST2026-01-30T11:11:25+5:302026-01-30T11:12:13+5:30
एका २७ वर्षीय महिला स्वाट कमांडोची तिच्या पतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

फोटो - ndtv.in
दिल्लीमध्ये एका २७ वर्षीय महिला स्वाट कमांडोची तिच्या पतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येपूर्वीच्या काही गोष्टी अत्यंत भयावह होत्या. काजल चौधरी असं या महिलेचं नाव असून तिचा भाऊ निखिल याने २२ जानेवारीच्या त्या भीषण घटनेबद्दल थरथरत्या आवाजात सांगितलं की, "जेव्हा काजलचा पती अंकुर जड डम्बलने तिच्या डोक्यावर वार करत होता, तेव्हा त्याने मला फोनवर बोलणं रेकॉर्ड करायला सांगितलं. हे रेकॉर्डिंग पोलीस पुरावा म्हणून वापरू शकता, असंही तो म्हणाला. त्यानंतर त्याने मला सांगितलं की तो काजलला मारत आहे आणि मग, मला फक्त तिच्या किंकाळ्या ऐकू आल्या."
दिल्लीपोलिसांचं विशेष युनिट 'स्वाट'मध्ये तैनात असलेली काजल हल्ल्याच्या वेळी मोहन गार्डन येथील आपल्या घरी होती. ती चार महिन्यांची गर्भवती होती. संरक्षण मंत्रालयात लिपिक असलेल्या तिचा पती अंकुर याला हल्ल्यानंतर काही तासांतच अटक करण्यात आली. तो दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात होता. काजलने पाच दिवस मृत्यूशी झुंज दिली, मात्र २७ जानेवारीच्या सकाळी गाझियाबादमधील एका रुग्णालयात मृत्यू झाला.
"मी तुझ्या बहिणीला मारतोय..."
संसद मार्ग पोलीस ठाण्यात तैनात असलेला काजलचा भाऊ कॉन्स्टेबल निखिलने सांगितलं की, अंकुरच्या फोननंतर हा सर्व प्रकार सुरू झाला. त्याने मला फोन केला आणि सांगितलं की तुझ्या बहिणीला समजून सांग. मी त्याला शांत व्हायला सांगितलं आणि लगेच बहिणीला फोन लावला. काजल सहसा आम्हाला तिच्याबद्दल जास्त काही सांगत नसे, पण त्या दिवशी ती तिची व्यथा मांडत होती. आम्ही बोलत असतानाच, ती मला सर्व काही का सांगतेय यावरून अंकुर संतापला आणि त्याने तिच्याकडून फोन हिसकावून घेतला. त्यानंतर तो मला म्हणाला, हा कॉल रेकॉर्डिंगवर ठेव, पोलिसांना पुराव्यासाठी उपयोगी पडेल. मी तुझ्या बहिणीला मारतोय. पोलीस माझं काहीच करू शकणार नाहीत. त्यानंतर मला फक्त काजलच्या किंकाळ्या ऐकू आल्या, काळजाचं पाणी झालं आणि फोन अचानक कट झाला."
"ही मेली आहे, रुग्णालयात ये"
निखिलच्या म्हणण्यानुसार, सुमारे पाच मिनिटांनंतर पुन्हा फोन वाजला आणि अंकुर म्हणाला, "ही मेली आहे, रुग्णालयात ये." यानंतर निखिल पोलिसांसह तातडीने तिथे पोहोचला. अंकुर आणि त्याचे कुटुंबीय आधीच तिथे होते. निखिल म्हणाला, "जेव्हा मी माझ्या बहिणीला पाहिलं... शत्रूही कोणाला इतक्या क्रूरपणे मारणार नाही." कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, काजलचे डोकं पूर्णपणे ठेचलं गेलं होतं आणि शरीरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या. तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि गाझियाबादच्या रुग्णालयात तिचा अंत झाला.
लव्ह मॅरेज झालं होतं
पानिपतमध्ये कॉलेजमध्ये असल्यापासून एकमेकांना ओळखत होते आणि २३ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचं लव्ह मॅरेज झालं होतं. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, हरियाणातील गन्नौर येथील त्यांच्या मूळ घरी सतत होणाऱ्या भांडणामुळे ते डिसेंबर २०२४ मध्ये पश्चिम दिल्लीतील मोहन गार्डन येथे भाड्याच्या घरात राहायला आले होते. मात्र, तिथेही वाद सुरूच राहिले. पोलिसांनी सांगितलं की, आर्थिक चणचण आणि घरगुती भांडणं ही या तणावामागची मुख्य कारणं होती. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं, "दाम्पत्यावर काही कर्ज होते आणि पैशांवरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचे. अंकुरने आधी काजलचे डोकं आपटलं आणि त्यानंतर डम्बलने तिच्यावर हल्ला केला."