८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:59 IST2026-01-14T11:58:56+5:302026-01-14T11:59:58+5:30
८१ वर्षीय डॉक्टर ओम तनेजा आणि त्यांच्या ७७ वर्षीय पत्नी डॉक्टर इंदिरा तनेजा यांना टार्गेट करण्यात आलं.

८० वर्षांच्या डॉक्टरची १५ कोटींची फसवणूक! १७ दिवस 'डिजिटल अरेस्ट', ७०० बँक खात्यांत पैसा
दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात महत्त्वाचं यश मिळवलं आहे. वृद्ध डॉक्टर दाम्पत्याकडून फसवणूक करून लुटलेल्या १४ कोटी ८५ लाख रुपयांपैकी सुमारे १.९० कोटी रुपये पोलिसांनी फ्रीज केले आहेत. ही फसवणूक 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात अडकवून करण्यात आली होती. या प्रकारच्या घोटाळ्यामध्ये लोकांना फोन आणि व्हिडीओ कॉलवर धमकावून घराबाहेर न पडण्यास आणि कोणाशीही न बोलण्यास भाग पाडलं जातं.
दक्षिण दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथे राहणारे ८१ वर्षीय डॉक्टर ओम तनेजा आणि त्यांच्या ७७ वर्षीय पत्नी डॉक्टर इंदिरा तनेजा यांना टार्गेट करण्यात आलं. २४ डिसेंबर ते ९ जानेवारी या काळात या दोघांवर सतत फोन आणि व्हिडीओ कॉलवरून लक्ष ठेवण्यात आलं होतं. ठगांनी ते अधिकारी असल्याचं सांगितलं.
७०० हून अधिक बँक खात्यांचा वापर
तुमच्या नावाने बनावट आणि बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याचं सांगून त्यांना घाबरवण्यात आलं. अटक आणि न्यायालयीन कारवाईची धमकी देऊन त्यांच्याकडून वारंवार पैसे ट्रान्सफर करून घेतले गेले. पोलीस तपासात असं समोर आलं आहे की, फसवणुकीची रक्कम लपवण्यासाठी ७०० हून अधिक 'म्युल' (Mule) बँक खात्यांचा वापर केला. सुरुवातीला हे पैसे गुजरात, आसाम, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तराखंडमधील सात खात्यांमध्ये पाठवण्यात आलं. त्यानंतर, पोलिसांना तपासात गुंगारा देण्यासाठी ही रक्कम तातडीने २०० ते ३०० इतर खात्यांमध्ये फिरवण्यात आली.
गुवाहाटीपासून गुजरातपर्यंत पैशांचे व्यवहार
दिल्ली पोलिसांच्या तपासानुसार, २६ डिसेंबर रोजी आसाममधील गुवाहाटी येथे सुमारे १.९९ कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. २९ आणि ३० डिसेंबर रोजी गुजरातच्या वडोदरा येथे प्रत्येकी दोन कोटी रुपये पाठवण्यात आले. २ जानेवारीला दिल्लीतील मयूर विहारमध्ये २ कोटी रुपये आणि ५ जानेवारीला मुंबईतील नेपियन सी रोडवरील एका खात्यात २.०५ कोटी रुपये जमा झाले.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे 'मल्टी-लेयर म्युल अकाउंट नेटवर्क' अत्यंत गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे पैशांचा संपूर्ण माग काढण्यासाठी वेळ लागत आहे. पोलीस बँक आणि 'फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट'च्या मदतीने संबंधित खात्यांची ओळख पटवून ती फ्रीज करत आहेत. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र तपास वेगाने सुरू आहे.